Sarfnala Project Oveflow
आजऱ्यातील सर्फनाला मुसळधार पावसामुळे भरला आहे. Pudhari News network
कोल्हापूर

आजरा : सर्फन‍‍ाला प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले

पुढारी वृत्तसेवा

सचिन कळेकर

सोहाळे : आजरा तालूक्यातील चित्री मध्यम प्रकल्पात ८७ टक्के पाणीसाठा झाला असून यंदा पहिल्याचवर्षी सर्फनाला मध्यम प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. शनिवारी दुपारपासून प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहेत. सांडव्यावरुन २१ क्युसेक्सने विसर्ग सुरु झाला आहे. यापुर्वीच तालुक्यातील धनगरवाडी व एरंडोळ प्रकल्प तुडूंब भरले आहेत. सर्फनाला प्रकल्पाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरु राहिल्याने हिरण्यकेशी व चित्री नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरुच असून शनिवारी सकाळी ८वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रकल्प परिसरातही पावसाचा जोर कायम असून चित्री परिसरात आतापर्यंत १६५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्फनाला प्रकल्पात पहिल्या वर्षी ६६ टक्के पाणीसाठा करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे होते. त्यामुळे ६६ टक्के पाणीसाठा झाल्याने सांडव्यावरुन विसर्ग सुरु झाला आहे. प्रकल्पामूळे पारपोली येथील २५० कुटुंब विस्थापीत होणार आहेत. या कुटुंबांच्या घरबांधणीचे काम शेळप व देवर्डे येथील हद्दीत युद्ध पातळीवर सुरू आहे. यावर्षी पासून पेरणोली, देवर्डे, गवसे, शेळप, कोरीवडे, देवकांडगाव, हरपवडे, साळगाव, सोहाळे, सुलगाव, चांदेवाडी आदी गावातील एकूण १६०० हेक्टर जमीन लाभक्षेत्राखाली येणार आहे. पावसाळ्यानंतर बारा महिने पाणीसाठा हिरण्यकेशी नदीत राहणार आहे.

तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पही भरण्याच्या वाटेवर आहे. गुरुवारी दुपारी पाण्याखाली गेलेला साळगाव बंधारा शनिवारीही वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आला होता. असाच चार दिवस संततधार पाऊस राहील्यास चित्री प्रकल्प १००टक्के भरणार आहे.

SCROLL FOR NEXT