Police Custody File Photo
कोल्हापूर

Suraj Sakhare Firing Case | शूटरना तीन दिवसांची पोलिस कोठडी

सूरज साखरे गोळीबार प्रकरण; पिस्तूलचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुंड सूरज साखरेवर गोळीबार करणाऱ्या दोघा शूटरना पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी फिरवले. या दोघांकडून घटनास्थळाची रेकी, घटनेआधीची माहिती आणि घटनेनंतर कोणत्या मार्गाने पसार झाले, याची माहिती घेतली. देवा ऊर्फ रफिक पिरसाहेब मुल्ला (वय ३९, रा. शाहू कॉलनी, विक्रमनगर) व शाहबाज राजू मुल्ला (वय २३, रा. मणेरमळा) या दोघांना सकाळी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सराईत गुंड सूरज साखरेवर गुरुवारी (दि. १६) दुपारी तीनच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रफिक मुल्ला व शाहबाज मुल्ला या सख्ख्या चुलत भावांना अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्याचे काम सुरू आहे.

सुपारीच्या मास्टरमाईंडचा शोध सुरू

सूरज साखरेवर गोळीबार करण्याची सुपारी रफिक व शाहबाज यांना कोणी दिली. या कटाचा मास्टरमाईंड कोण आहे. याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून सुरू आहे. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण हल्लेखोरांकडे पिस्तूल, मोटार आणि मास्टरमाईंडबाबत कसून चौकशी करत आहेत. दोघेही पोलिस तपासाला फारसा प्रतिसाद देत नसून कॉल डिटेल्सच्या आधारे सुपारी देणाऱ्याचा शोध सुरू आहे.

संशयितांकडे चौकशी, तीन पथके तैनात

सूरज साखरेवर अनैतिक संबंधातून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे; पण सूरजची पार्श्वभूमी पाहता आर्थिक वाद व वर्चस्ववाद किंवा अन्य कोणते कारण आहे काय याचाही सखोल तपास सुरू आहे. सुपारी देणाऱ्या काहींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांच्या नातेवाईकांकडे दोन दिवस चौकशी सुरू आहे. काही संशयित गायब असून, त्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत.

संशयितांना घटनास्थळी फिरवले

दरम्यान अटकेतील रफिक व शाहबाज यांना शनिवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळावरून फिरवले. त्यांच्याकडून घटनेदिवशीचा तपशिल जाणून घेतला. घटनेपूर्वी कितीवेळ ते घटनास्थळी होते, दोघांव्यतिरिक्त अन्य कोणी घटनास्थळी होते काय याचीही माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT