कोल्हापूर : कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी शहर म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरावर विरोधी उमेदवारामुळे गद्दारीचा डाग लागला आहे. सुरत गुवाहाटी मार्गे पळून जाणार्या या गद्दारांमुळे अत्यंत दुर्दैवी इतिहास महाराष्ट्रात घडला. हा इतिहास बदलायचा असेल व कोल्हापूर शहरावर पडलेला गद्दारीचा डाग पुसायचा असेल तर सामान्य कार्यकर्ता राजेश लाटकर यांना निवडून देण्याचे आवशाहन आ.सतेज पाटील यांनी केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते.
यावेळी रवीकिरण इंगवले, सचिन चव्हाण, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, सरलाताई पाटील, पद्मजा तिवले प्रमुख उपस्थित होते. आ. सतेज पाटील म्हणाले, महिला व मुलींसाठी बस प्रवास मोफत, प्रत्येकी पाचशे रुपयात सहा सिलेंडर, कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकर्यांचे तीन लाख रुपये पर्यंत कर्ज माफी, नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांना पन्नास हजार प्रोत्साहन, अशा योजना जाहीरनाम्यात समाविष्ट आहेत. शाहू महाराज म्हणाले. दीड हजार रुपये देऊन सरकारने अडीच हजार रुपये काढून घेतले असे चुकीचे धोरण राबवणारे या सरकारला सत्तेतून घालवले पाहिजे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, लाटकर यांच्या नावामध्येच लाट आहे, जनतेच्या पाठबळावर ही लाट विरोधकांना उध्वस्त करून टाकेल. सभेला डी.जी.भास्कर, जयसिंगराव रायकर, रमेश पवार, अनिल माने, संभाजीराव जगदाळे, गिरीश कदम, शिरीष कदम, निरंजन कदम, प्रताप जाधव, सुजय पोतदार, श्रीधर गाडगीळ, सुरेश कदम, किशोर माने, रमाकांत आयरेकर, किरण पवार, जयसिंगराव साळोखे, दत्तात्रय मांडेकर, मदन भोसले, बंडोपंत सुतार, सर्जेराव टोपकर, प्रताप सुर्वे, पांडुरंग जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश लाटकर यांचे चिन्ह प्रेशर कुकर आहे. आपल्या घराघरात प्रेशर कुकर आहेत जे आपण रोज पाहतो. पण उत्तरेश्वर पेठेतील ही गर्दी पाहून विरोधी उमेदवाराचे ‘प्रेशर’ नक्की वाढणार असे सांगून संजय पवार यांनी लाटकर विजयी होतील व त्यांच्या प्रेशर कुकरमधून कोल्हापूरच्या विकासाची शिट्टी जोरात वाजेल असे म्हणताच टाळ्या वाजवून लोकांनी अनुमोदन दिले.