कोल्हापूर : आमदार सतेज पाटील कोल्हापूरचे नव्हे, तर राज्याचे आश्वासक नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचा विकास करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. महविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जवाहरनगर चौक आणि मिजरकर तिकटी येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते.
थोरात म्हणाले, भाजपने जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचार्यांना साथ देत स्त्रियांवर अन्याय करणार्यांचा सन्मान केला. देशातील स्वायत्त संस्थांचा राजकारणासाठी वापर सुरू आहे. सत्तेसाठी, भीतीपोटी अनेकजण काँग्रेस सोडत असताना आमदार सतेज पाटील काँग्रेसची साथ देत आहेत. सतेज पाटील कोल्हापूरचे सुपुत्र, राज्याचे नव्हे, तर देशाचे आश्वासक नेतृत्व आहे. सत्ता परिवर्तन होत असते. राज्यात, देशातही पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेची सत्ता आल्यास राबविण्यात येणार्या योजनांबद्दल माहिती देऊन विरोधक काय करणार, ते सांगत नाहीत. केवळ माझ्या नावाचा जप करण्याशिवाय दुसरे ते काही करत नाहीत, असे सांगितले. माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, महायुतीकडे नेत्यांसह धनदांडग्यांची फौज असली, तरी काँग्रेसकडे जनतेची फौज आहे. थेट पाईपलाईनबाबत टीका करणार्यांच्या घरातही या योजनेचे पाणी येते, हे विसरू नये. ही योजना पूर्ण केली; मात्र भाजपच्या मंत्रीपुत्राकडे असणारे अंतर्गत पाईपलाईनचे काम अपूर्ण आहे.
खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर शहराची दिशा ठरविणारी महापालिकेची निवडणूक असल्याने जनतेने काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन केले. अस्लम सय्यद, भूपाल शेटे, हरिदास सोनवणे, प्रा. किसन कुराडे, दशरथ दिशांत, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांची भाषणे झाली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिवसेनेचे संजय पवार, माकपचे डॉ. उदय नारकर, भाकपचे रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, बाळासाहेब सरनाईक, राजेंद्र ठोंबरे यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
सतेज पाटील आश्वासक नेतृत्व
सतेज पाटील हे कोल्हापूरचे नव्हे, तर महाराष्ट्राचे अश्वासक नेतृत्व आहे. महानगरपालिकेचा जाहीरनामा पाहिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावरच सोपविण्यात येईल. महाराष्ट्र त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे. अशावेळी त्यांच्या पाठीशी कोल्हापूर असल्याचे दाखवून देण्याची संधी या निमित्ताने कोल्हापूरकरास मिळत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून ती त्यांनी दाखवून द्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले.
हीच कोल्हापूरकरांची ताकद
महापालिकेच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांच्या पाठबळावर मी एकटा लढत आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना यावे लागत आहे, हीच कोल्हापूरकरांची ताकद आहे, असे आमदार पाटील म्हणाले.
सुभेदार यांचा खा. शाहू महाराजांकडून विशेष उल्लेख
प्रभाग क्रमांक बारामधील उमेदवार रियाज सुभेदार यांचा खासदार शाहू महाराज यांनी विशेष उल्लेख केला. त्यामुळे त्याची उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.
ते आमचा जाहीरनामा वाचतात
राज्यसभेचे खासदार हे प्रत्येक ठिकाणी आमचा जाहीरनामा वाचत असतात. आम्हाला लोकांना काय सांगायचे आहे, ते विरोधक सांगत आहेत, असे सचिन चव्हाण यांनी सागितले.
कुस्ती मारल्याशिवाय मैदान सोडत नाही
थेट पाईपलाईनवरून आपल्यावर टीका करत विरोधकांनी काँग्रेसचा निम्मा प्रचार केला आहे. काही कारणाने लोक सोडून जातात; पण त्याची काळजी करण्यापेक्षा नवीन कार्यकर्ते मी तयार करतो आणि मैदानात उतरतो. मैदानात उतरल्यावर मात्र कुस्ती मारल्याशिवाय मैदान सोडत नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूरकर गद्दारांना गाडतील : इंगवले
सतेज पाटील यांनी अनेकांना पदे देऊन मोठे केले. परंतु, ज्यांना ताकद दिली, तेच त्यांना सोडून गेले. ज्यांना महापौर केले अशा माणसांनीही त्यांच्याशी गद्दारी केली. परंतु, कोल्हापूरकर या गद्दारांना कधीही माफ करणार नाहीत. या निवडणुकीत कोल्हापूरकर निश्चितपणे या गद्दारांना गाडतील, असे शिवसेनचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी सांगितले.