कोल्हापूर : सर्वसामान्य रुग्णांसाठी जिल्हा परिषदेची रुग्णालये आधारवड आहेत; मात्र जि. प.चा आरोग्य विभाग बनावट औषधांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. येथील विशाल एन्टरप्राईजेसकडून आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या 2 लाख 27 हजार अॅझिथ—ोमायसिन (500 मिलिग्रॅम) या अँटिबायोटिक्स गोळ्या बनावट असल्याचे अन्न-औषध प्रशासन विभागाच्या तपासणीतून समोर आल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे यातील तब्बल 1 लाख 37 हजार 500 गोळ्या रुग्णांना दिल्या आहेत. रुग्णांच्या थेट जीवाशी खेळ सुरू असल्याने तीव— संताप व्यक्त होत आहे.
विशाल एन्टरप्रायझेसने दिलेली औषधे स्टँडर्ड क्वॉलिटीची नसल्याचे अन्न-औषध विभागाच्या तपासणीतून समोर आले. गेली दोन वर्षे ही कंपनी जि. प.ला औषध पुरवठा करत आहे. या वर्षी 50 लाख रुपयांची औषधे या कंपनीकडून खरेदी केली होती.
सुमारे 1 लाख 50 हजार गोळ्या लो स्टँडर्ड क्वॉलिटीच्या होत्या. यातील तब्बल 1 लाख 37 हजार बनावट औषधे रुग्णांना दिली आहेत. त्यातील केवळ 12 हजार गोळ्या सील केल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
घशाचा संसर्ग झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांकडून अॅझिथ—ोमायसिन हे अँटिबायोटिक्स दिले जाते. सर्रास शासकीय रुग्णालयात या अँटिबायोटिक्सचा वापर केला जातो. हीच औषधे बनावट निघाली आहेत. यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्हा औषध भांडारगृहालादेखील विशाल एन्टरप्रायझेसने औषध पुरवठा केला. जिल्हा औषध भांडारगृहाने या कंपनीकडून 80 ते 90 लाखांची इंजेक्शन व गोळ्या खरेदी केल्या. या औषधांची एनएबीएल लॅबकडून तपासणी केली. मात्र, ही औषधे बनावट नसल्याचे तपासणी अहवालातून समोर आल्याचे फार्मासिस्ट सागर नागवेकर यांनी सांगितले.
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत विशाल एन्टरप्रायझेसकडून औषधे खरेदी केली. यात मार्च 2024 मध्ये सुमारे 40 लाख, सप्टेंबर 2024 मध्ये 1 कोटी 24 लाख पुन्हा सप्टेंबर महिन्यात दुसरी ऑर्डर 1 कोटी 15 लाखांची दिली आहे. यात बनावट औषधे सापडली नाहीत. 2021 पासून या कंपनीकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी औषध पुरवठा केला जात असल्याचे डॉ. विठ्ठल कारंडे यांनी सांगितले.
अँटिबायोटिक गोळ्या स्टँडर्ड क्वॉलिटीच्या नसल्याचे अन्न-औषध प्रशासनाने एप्रिलमध्ये जि. प.ला सांगितले होते. यानंतर जि. प.ने विशाल एन्टरप्रायझेसला दोन नोटिसा बजावल्या; मात्र त्यांना केराची टोपली दाखवली. इतके दिवस हे प्रकरण दाबून ठेवले होते. राज्यभरातून बनावट औषधांच्या विरोधात शोधमोहीम सुरू झाल्यानंतर आज जि. प.मधील हे प्रकरण समोर आले.