Ambabai Temple | पहिल्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांचा अंबाबाईला चरणस्पर्श 
कोल्हापूर

Ambabai Temple | पहिल्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांचा अंबाबाईला चरणस्पर्श

भाविकांनी अनुभवला किरणोत्सवाचा अद्‍भुत सोहळा; ‘अंबेचा’ जयघोष

अरुण पाटील

कोल्हापूर : मावळतीच्या सूर्याची सोनेरी किरणे मंदिराच्या महाद्वारातून आत प्रवेश करत गरुड मंडपाचा प्रवास करीत गाभाऱ्याच्या दिशेने सरकू लागली. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत असतानाच संगमरवरी पायरीच्या आत सूर्यकिरणांनी प्रवेश केला आणि गाभाऱ्यातील दिवे मालवले. काही क्षणांतच मावळतीच्या सूर्यकिरणांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या चरणांना स्पर्श केला. या मंगलमय क्षणाचे साक्षीदार होताच उपस्थित भाविकांनी ‘अंबा माता की जय’, ‘अंबेचा उदो उदो’चा जयघोष करत किरणोत्सवाचा सोहळा भक्तिभावाने साजरा केला. दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणस्पर्शाने आपली उपस्थिती नोंदवली; मात्र अखेरच्या टप्प्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सूर्यकिरणांची तीव्रता काहीशी कमी झाली.

सलग दोन दिवस किरणोत्सवाच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या किरणोत्सवाबाबत भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती. सायंकाळी पाचच्या सुमारास मावळतीच्या सूर्याची किरणे मंदिराच्या महाद्वारातून आत आली. त्यानंतर महाद्वार रोड, गरुड मंडपामागील परिसर, सदर, गरुड मंडप असा प्रवास करत किरणे गणपती मंदिरामागे पोहोचली. तेथून कासव चौक आणि पितळी उंबरा पार करत किरणांनी गाभाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण केले.

सायंकाळी ५.४८ वाजता सूर्यकिरणांनी अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या चरणांना स्पर्श केला. हा क्षण अनुभवण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. किरणांचा गाभाऱ्याकडे होणारा प्रवास पाहताना प्रत्येकाच्या नजरा देवीच्या मूर्तीकडे खिळल्या होत्या. चरणस्पर्शाचा क्षण अनुभवताच भाविकांनी ‘जय अंबे’चा गजर केला. त्यानंतर सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला लुप्त झाली. किरणोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अपेक्षित तीव्रतेने सूर्यकिरणांचा सोहळा अनुभवता आला नाही; मात्र देवीच्या चरणांपर्यंत किरणांनी मजल मारल्याने पहिल्या दिवसाचा किरणोत्सव भाविकांसाठी समाधान आणि भक्तिभावाची पर्वणी ठरला.

दरम्यान, ९, १० व ११ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस दक्षिणायन किरणोत्सव सोहळा होणार आहे. पहिल्या दिवशीच सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केल्याने पुढील दोन दिवसांच्या किरणोत्सवाबाबत भाविकांची उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT