अनुराधा कदम
कोल्हापूर : कौटुंबिक कलह, वैवाहिक वादाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या महिलांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत भोंदूगिरीने त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण करून गल्ला भरणारा कथित चुटकीबाबा सनी भोसले याने महिलांना गळाला लावले आहेच; पण याच बुवाबाजीचा वापर करून त्याने वेश्या व्यवसायाचा धंदा सुरू केला आहे. व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून तो वेश्या पुरवणारा दलाल बनला असून त्याने आथिकदृष्ट्या सधन कुटुंबातील अनेक महिलांना जाळ्यात ओढले आहे. गंडेदोरे करणारा साधा बुवा यापासून सुरू झालेल्या सनी भोसलेच्या कारनाम्याचे शेवटचे टोक कोल्हापुरातील भयंकर सेक्स रॅकेटपर्यंत पोहोचले आहे.
चुटकीबाबा बनलेल्या सनी भोसलेने फुलेवाडी रिंग रोड परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात दरबार भरवण्यासाठी चार खोल्यांचे घर भाड्याने घेतले होते. मी ब—ह्मांडाचा मालक आहे, असे म्हणत आसुरी हास्य करत तो दरबारात दरारा निर्माण करायचा. कधी भगवी कफनी तर कधी जीन्स - टी शर्ट आणि डोक्याला भगवा मफलर बांधून हातात त्रिशूल धरून एका पायावर उभे राहात ‘जय महाकाल’ म्हणत ओरडायचा. याच घरावर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी छापा टाकला असता तेथे बुवाबाजीच्या साहित्याबरोबरच मोबाईल फोनची वेगवेगळ्या क्रमांकाची सिमकार्ड, गर्भ निरोधक साधनांची पाकिटे, तरुणी व महिलांचे फोटो सापडले. घरात पतीचे दुर्लक्ष होत असल्याचे गार्हाणे घेऊन त्याच्याकडे येणार्या महिलांना त्याने शिताफीने वेश्या व्यवसायाच्या विळख्यात अडकवले आहे. महिलांना संमोहित करून तो पैसे उकळतो. एकीकडे दरबारात भूतबाधा, करणी काढण्यासाठी भोंदूगिरी करायचा आणि त्यातून महिलांशी संपर्क वाढवायचा, त्यांना संमोहित करून लैंगिक संबंधाच्या जाळ्यात ओढायचा. सनी भोसले याने वेश्या व्यवसायात महिला पुरवण्यासाठी तयार केलेल्या ग्रुपमधील अडीचशे महिला सधन कुटुंबातील आहेत, हे दुर्दैव आहे.
सनी भोसले याचा एक व्हॉटसअप ग्रुप आहे. त्यामध्ये सनीसह चार पुरुष सोडल्यास सर्व महिला आहेत. जे दादा, पिंटू, भैया, नाना या नावाचे चार पुरुष आहेत ते शिवाजी पेठ, टिंबर मार्केट, वाशी नाका, संभाजीनगर या परिसरातील आहेत. या ग्रुपवरच त्या सर्वांमध्ये वेश्या व्यवसायाच्या व्यवहाराच्या चर्चा होतात. फोटो पाठवले जातात. या सगळ्या व्यवहाराचा लगाम सनीच्या हातात आहे. तसेच वेश्या पुरवण्याची आर्थिक बोलणी करणे, महिलांसोबत अश्लील बोलणे यासाठी सनीकडे जे मोबाईल फोन आहेत, त्यातील सिमकार्ड मात्र महिलांच्या नावाने आहेत. माझा फोन हॅक होऊ शकतो, अशी कारणं देत तो समोरच्या महिलेच्या नावानेच सिमकार्ड घेतो.