कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी घडामोड घडली आहे. निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्याने, त्याची 'नैतिक जबाबदारी' स्वीकारून उबाठा पक्ष कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला असून, यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
आपल्या राजीनामा पत्रात सुनील मोदी यांनी पराभवाच्या कारणांचा पाढाच वाचला आहे. "निवडणूक प्रक्रियेत स्थानिक पातळीवर झालेली गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि संघटनात्मक दुर्लक्ष यामुळे पक्षाचे नुकसान झाले," असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. वारंवार वरिष्ठांच्या निदर्शनास या बाबी आणूनही संघटनात्मक ताकद एकवटली नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सुनील मोदी यांनी या पत्रात काँग्रेस नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. "बंटी पाटील यांनी युतीधर्म पाळत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले," असे म्हणत मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पदाचा त्याग करताना सुनील मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "पदावर राहून स्पष्टीकरण देण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारणे ही शिवसेनेची संस्कृती आहे. मी पद सोडले असले तरी माझी निष्ठा कमी झालेली नाही. यापुढेही कोणत्याही पदाविना मी एक सामान्य शिवसैनिक म्हणून 'मातोश्री'शी एकनिष्ठ राहून काम करत राहीन," असेही त्यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.