कोल्हापूर : भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी सुमितकुमार यादव यांनी केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) कोल्हापूर आयुक्तालयाच्या आयुक्तपदाचा नुकताच पदभार स्वीकारला. यानंतर त्यांनी जीएसटी प्रशासन अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि करदाता केंद्रित करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
यादव यांनी व्यापार सुलभीकरण, पारदर्शकता आणि करदात्यांना दर्जेदार व प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता राहील, असे सांगितले. तसेच प्रलंबित जीएसटी प्रकरणांचा वेळेत निपटारा, डिजिटल प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी, तक्रार निवारण यंत्रणा अधिक गतिमान करणे आणि महसूल वृद्धीसाठी समन्वयात्मक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यादव यांच्या स्वागतप्रसंगी आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जीएसटी व्यवस्थेची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच करदात्यांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कोल्हापूर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश असून या विभागातील जीएसटी प्रशासनाची जबाबदारी आता यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.