Top sugarcane trolley accident
टोप : टोप (ता. हातकणंगले) गावात महामार्गावरील ग्रामपंचायत कार्यालयानजीक ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने आज (दि.१६) पहाटे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव–वांगी परिसरातून दालमिया शुगर, आसुर्ले-पोरळे येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एम.एच. १० ईए ४५०६) महामार्गावरून जात असताना चालकाला रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने पुढे असलेल्या ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे ट्रॅक्टर ट्रकला धडकला आणि ट्रॅक्टरला जोडलेली ऊसाची ट्रॉली रस्त्यावर पलटी झाली.
अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात ऊस पसरल्याने वाहतूक ठप्प झाली. यामध्ये काही रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या. महामार्ग पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकांना गावातून शिये फाट्याकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याने मार्गस्थ करण्यात आले.
दरम्यान, पलटी झालेली ट्रॉली बाजूला करण्यात आली असली, तरी ऊस उचलण्याचे काम सुरू असल्यामुळे बराच काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती.