कोल्हापूर : ऊस दरासाठीच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर कागलपासून ते कराड-उंब्रजपर्यंत तीन दिवसांपासून वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. हजारो ट्रक महार्मालगत थांबून राहिल्याने या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.
पोलिस यंत्रणेने पुणे-मुंबई आणि कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वडगाव-आष्टा-पेठनाका पर्यायी मार्ग दिला आहे. तासगाव-विटा-सातारा असाही पर्यायी मार्ग दिला आहे. पण परप्रांतातून आलेल्या अनेक ट्रक चालकांना पर्यायी मार्गाची माहितीच नसल्यामुळे व प्रवासाच्या वाढीव अंतराच्या भाड्याला संबंधितांनी हरकती घेतल्याने हजारो ट्रक चालकांनी महामार्गाच्या दुतर्फा ट्रक उभा केले आहेत. कोल्हापूर-सांगली मार्गावरही ट्रक उभा आहेत.
सांगली फाटा, शिये फोटा, टोप, अंबप फाटा, वाठार या ठिकाणी रात्रंदिवस वाहतूक कोंडी होत आहे. पेठनाका, कराड, ओगलेवाडी फाटा, उंब्रज या ठिकाणीही वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. जाणारी आणि येणारी वाहने एकाच मार्गावरून घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे.
चक्काजाम आंदोलनामुळे कोल्हापूरच्या बाजारपेठेतील मालाला ब्रेक
चक्का जाम आंदोलनाचा फटका आता कोल्हापूरच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्राला बसू लागला आहे. आंदोलनामुळे मालवाहतूक ठप्प झाली आहे. विविध प्रकारच्या डाळी, तांदूळ, ज्वारी, गहू यांसह अन्य धान्यांचे २५ ते ३० ट्रक अडकून पडले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणातील विविध भागांत हृदयविकार आणि मधुमेहावरील औषधांचा पुरवठा केला जातो. या औषधांचे दररोज तीन ते चार ट्रक कोल्हापुरात येतात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून हे ट्रक आलेले नाहीत. त्यामुळे औषधांच्या विक्री आणि वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे, असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.
विविध प्रकारच्या डाळींसह अन्य धान्यांचे दररोज २५ ते ३० ट्रक कोल्हापुरात दाखल होतात. महामार्गावरील आंदोलनामुळे या ट्रकची वाहतूक थांबली आहे. आंदोलन लांबल्यास बाजारपेठेत धान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, असे कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनचे संचालक संजीव परीख यांनी सांगितले.