कोल्हापूर : ऊस दर निश्चित न करताच साखर कारखाने सुरू केल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. साखर प्रतिक्विंटल ४७०० ते ५६०० रुपये दराने विकली जात आहे. मग, यंदा उसाला पहिली उचल ४५०० रुपये प्रतिटन द्यायला कारखानदारांना अडचण काय? जोपर्यंत दर ठरत नाही, तोपर्यंत उसाचं कांडं तोडू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ऊस दराची बैठक अखेर निष्फळ ठरली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, चर्चा केल्याशिवाय ऊस दराचा प्रश्न सुटणार नाही. दर जाहीर करण्यापूर्वीच कारखाने सुरू केले आहेत. ते कारखाने बंद करा. ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांपेक्षा मोठे आहेत काय, असा सवाल उपस्थित केला. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, उसाला दर मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आम्ही कारखानदार नाही, तर संस्थाचालक आहे. साखरेला बऱ्यापैकी दर मिळाला आहे.; पण हाच दर पुढे कायम राहील याची शाश्वती नाही. शेतकरी संघटना, सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी एकत्र बसून तोडगा काढूया, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने म्हणाले, ऊस उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. गेल्या हंगामात साखर, बगॅस, इथेनॉलसह उपपदार्थांना चांगले दर मिळाले आहेत. प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, उसाच्या रिकव्हरीच्या प्रमाणात दर द्यावा. एचएमपी अट रद्द करावी. साखर उद्योगाचे कायदे कडक करावेत. साखर ५० ते ६० रुपये असेल, तर उसाला प्रतिक्विंटल ४५०० रुपये दर द्यायला अडचण काय, असा सवाल केला. राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ऊस दराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? अंकुश शेतकरी संघटनेचे धनंजय चुडमुंगे यांनी साखरेच्या बाजारभावाशी ऊस दराची सांगड घाला, अशी सूचना केली. अजित पोवार, बाजीराव देवाळकर, वैभव कांबळे, रूपेश पाटील, जनार्दन पाटील, भगवान काटे, सावकार मादनाईक, ॲड. माणिक शिंदे यांनी भूमिका मांडली.
वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधीला हाकलले
ऊस दर बैठकीला वाहतूकदार संघटनेचा प्रतिनिधी उपस्थिता होता. तो मत व्यक्त करत असताना शेतकरी संघटनेने त्यांच्यावर आक्षेप घेत बैठकीतून बाहेर हाकला, अशी भूमिका घेतली. यावेळी गोंधळ झाला. पोलिसांनी संबंधिताला बाहेर काढले.