kolhapur | यंदा उसाची लागण घटली... पुढील हंगामाची चिंता वाढली 
कोल्हापूर

kolhapur | यंदा उसाची लागण घटली... पुढील हंगामाची चिंता वाढली

दुष्काळाचा फटका; गतवर्षीच्या तुलनेत जिल्‍ह्यात १२ हजार हेक्टरला फटका

पुढारी वृत्तसेवा

भीमगोंडा देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊसलागवडीला दुष्काळी परिस्थितीचा फटका बसत आहे. पाण्याअभावी आडसाली उसाचे क्षेत्र कमी झाले असून, पूर्वहंगामी लागवडीचाही वेग मंदावला आहे. गतवर्षी याच कालावधीत ३६ हजार ९६० हेक्टरवर ऊस लागवड झाली. यंदा मात्र हे क्षेत्र तब्बल २४ हजार ९२५ हेक्टरवरच आहे. तुलनेत तब्बल १२ हजार ३५ हेक्टरने लागवड घटली. ही घट अशीच कायम राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम आगामी गळीत हंगामावर होण्याची भीती व्यक्त होत असून, अनेक साखर कारखान्यांची धुराडी पेटणार का, असा प्रश्न निर्माण होणार आहे.

जिल्ह्यात उसाचे सरासरी लागवड क्षेत्र १ लाख ९८ हजार ६०४ हेक्टर असते. गतवर्षीच्या तुलनेत आडसाली लागवडीत ८ हजार १८२ हेक्टरची घट आहे. सध्‍या पूर्वहंगामी लागवडीचा हंगाम सुरू आहे. पण, सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने विहिरी, कूपनलिका आणि अन्य जलस्रोतांतील पाणी कमी होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाले नाही तर ऊस करपून जाईल, या भीतिपोटी शेतकरी लागणीचे क्षेत्र कमी करत आहेत. ऊस लागवडीतील घट ही केवळ चालू हंगामापुरती मर्यादित राहणार नसून, तिचे पडसाद पुढील वर्षीच्या साखर उत्पादनावर उमटण्याची शक्यता आहे.

दुष्काळामुळे यंदा ऊसलागवड मंदावत आहे. गतवर्षीच्या तुलनेत आडसाली लागणीत घट झाली आहे. पुढील साखर हंगामावर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी खोडवा आणि निडवा राखावा. उसाच्या पाचटाचे योग्य व्यवस्थापन करून ते शेतातच ठेवावे.
नामदेव परीट, उपसंचालक, कृषी विभाग, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT