कोल्हापूर : सध्या पश्चिम महाराष्ट्रात उसाचा गळीत हंगाम जोरात सुरू झालेला दिसत आहे; पण गेल्या काही वर्षांत ऊस शेती हेच ज्यांचे जन्मस्थान आणि वसतिस्थान बनलेले आहे, असे बिबटे उसाची राने मोकळी होताच मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीत शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे आगामी काळात मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून लोकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे.
बिबट्यांची जन्मभूमी
मागील पंधरा-वीस वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या कारणांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक भागातील नैसर्गिक जंगलांचे क्षेत्र घटत गेले आहे. त्याचप्रमाणे या जंगलांमधील छोट्या-मोठ्या वन्य प्राणी-पक्ष्यांचे प्रमाणही घटत गेले आहे. त्यामुळे या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या बिबट्यांनी गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने जंगलालगत असलेल्या ऊस शेतीमध्ये आश्रय घेतल्याचे दिसत आहे. अशाप्रकारे ऊस शेतीत स्थिरावलेल्या बिबट्यांच्या एक-दोन पिढ्यांनी इथल्या ऊस शेतीतच जन्म घेतला आहे. उसातील कोल्हे, उंदीर, घुशी, गावांलगतची भटकी कुत्री, रात्रीच्या वेळी झाडांवर बसणारे मोर-लांडोर आणि अन्य पक्षी हेच या बिबट्यांचे अन्न बनलेले आहे. ही अन्नसाखळी तुटली की, ते अधूनमधून मानवी वस्तीत शिरताना दिसत आहेत.
बिबट्यांची संख्या अनिश्चित
पश्चिम महाराष्ट्रातील या पाच-सहा जिल्ह्यांमधील उसाच्या शेतीमध्ये नेमके किती बिबटे असावेत, याचा वन खात्यालाही अंदाज नाही. कारण, वाघाप्रमाणे बिबट्यांची स्वतंत्र गणना होत नाही; मात्र वारंवार बिबट्यांचे माणसांवर आणि इथल्या पाळीव प्राण्यांवर होत असलेले हल्ले आणि नित्यनेमाने होत असलेले त्यांचे दर्शन विचारात घेता या भागात किमान चार-पाचशेहून अधिक बिबटे असावेत, असा एक प्राथमिक अंदाज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बिबटे असतील, तर बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष अपरिहार्य ठरल्याशिवाय राहणार नाही.
ऊस हंगाम आणि बिबटे
सध्या या भागात ऊस हंगाम जोमात सुरू आहे आणि मोठ्या वेगाने उसाची शेती कमी होत चालली आहे. साहजिकच बिबट्यांच्या दृष्टीने त्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालला आहे. उसाचा हंगाम गती घेईल तसा हा वेग वाढतच जाणार आहे. अशावेळी ‘आपला नैसर्गिक अधिवास’ हरविलेला बिबट्या नव्या निवाऱ्याच्या आणि अन्न-पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका वाढतच जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उसाचे पीक पुन्हा वाढून त्यात बिबट्यांनी पुन्हा आश्रय घेईपर्यंत हे होत राहण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरात या भागात सातत्याने होत असलेले बिबट्यांचे हल्ले हे त्याचेच निदर्शक आहेत.
सतर्कतेची गरज
अशावेळी प्रामुख्याने शेतकरीवर्गाने शेत-शिवारांमध्ये वावरताना अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नागरी वस्त्यांमधील नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण, सध्या सुरू असलेला बिबट्या आणि माणसांमधील संघर्षालाही शेवटी माणूसच जबाबदार आहे, असे म्हणावे लागेल.
मुळात बिबट्या हा वन्यप्राणी सहसा माणसांवर हल्ला करायला धजत नाही. शक्यतो भटकी कुत्री, उंदीर, घुशी, माकडे अशी छोटी-मोठी जनावरे बिबट्याचे भक्ष्य असतात; पण एखाद्यावेळी बिबट्या नागरी वस्तीत शिरला, तर त्याला बघण्याच्या उत्सुकतेपोटी लोक प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे बिबट्या बिथरतो आणि लोकांवर हल्ला करू शकतो. रानावनात बिबट्याचा सामना झाल्ाा, तरी मोठ्याने आरडाओरडा केल्यास बिबट्या घाबरून पळ काढू शकतो. लोकांनी अशावेळी संयम पाळण्याची गरज आहे.- कुंदन हाथे, राज्य वन्यजीव मंडळ सदस्य