Sugercane Protest | ४५०० रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार!  
कोल्हापूर

Sugarcane Farmer Protest | ४५०० रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार!

३ नोव्हेंबरपासून किणी टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको; पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार, बुबनाळच्या बैठकीत निर्धार

पुढारी वृत्तसेवा

कवठेगुलंद : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. ३ नोव्हेंबरपासून किणी टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असून, पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी बुबनाळ येथे झालेल्या बैठकीत सात गावांतील शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात ताकदीने उतरण्याचा निर्धार केला.

बुबनाळ येथे झालेल्या बैठकीस औरवाड, गौरवाड, आलास, गणेशवाडी आणि शेडशाळ येथील प्रमुख पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. ऊस उत्पादकांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा आणि पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, यासाठी आंदोलन अधिक व्यापक करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत प्रत्येक गावात स्वतंत्र बैठका घेण्यात येणार आहेत. गावोगावी जनजागृती करून शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. कारखानदार आणि सरकारला शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देण्यासाठी मोठ्या संख्येने किणी टोलनाक्यावर उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT