Sugar Crushing Recovery Rate | राज्यातील ऑक्टोबरमधील ऊस गाळपाची रिकव्हरी घसरली  
कोल्हापूर

Sugar Crushing Recovery Rate | राज्यातील ऑक्टोबरमधील ऊस गाळपाची रिकव्हरी घसरली

विविध विभागांत साखर उतारा सात ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान; कारखानदारांसमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या पहिल्या टप्प्यातील ऑक्टोबर महिन्यातील साखर उताऱ्याची (रिकव्हरी) घसरण झाल्याचे चित्र समोर आले आहे. साखर आयुक्त प्रशासनाच्या दोन नोव्हेंबर अखेरच्या गाळप अहवालानुसार, राज्यातील विविध विभागांमध्ये साखर उतारा सात ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच साखर कारखानदारांसमोर कमी रिकव्हरीचे आव्हान उभे राहिले आहेे.

साखर टंचाई आणि दुष्‍काळामुळे यंदा सरकारने १५ ऑक्टोबरला ऊस गाळप हंगाम सुरू करण्‍याचा आदेश कारखानदारांना दिला. राज्यातील एकूण २२४ पैकी २०८ साखर कारखान्यांचे गाळप सुरू राहिले. उर्वरित साखर कारखाने ऊसदर आंदोलनामुळे बंद होते. दरम्यान, ऑक्टोबरमध्‍ये पुरेशा प्रमाणात उसाची वाढ न झाल्याने आणि कोवळा ऊस असल्याने साखर उतारा कमी राहिला. राज्यात नेहमी कोल्हापर विभागात दहा आणि त्यापेक्षा अधिक उतारा असतो. मात्र लवकर उसाचे गाळप झाल्याने या विभागातही ९ टक्केच उतारा राहिला.

परिपक्वता नसलेल्या उसाचे गाळप

यंदा गाळप हंगामाच्या सुरुवातीला ऊस उपलब्धता, उसाची परिपक्वता, हवामानातील बदल आणि ऊसतोडीची वेळ या घटकांचा साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याची शक्यता आहे, असे ऊस पीक अभ्‍यासकांचे म्हणणे आहे. आगामी काळात हंगामाच्या मध्‍यावर ऊस गाळप वाढल्यानंतर रिकव्हरीमध्ये सुधारणा होते का, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

१५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरअखेर विभागनिहाय रिकव्हरी टक्क्यांमध्‍ये

कोल्हापूर ९.०५, पुणे ८.७३ , अहिल्यानगर ७.९३, अमरावती ७.३५, सोलापूर ७.४३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ७.२६ टक्के, नांदेड ७.०७

ऑक्टोबरमध्‍ये अपरिपक्व ऊस गाळप केल्याने रिकव्हरी घटली आहे. याचा फटका कारखानदार आणि ऊस उत्पादकांना बसणार आहे.
विजय औताडे, साखर उद्योग अभ्‍यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT