वारणानगर : तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे. शेजारी प्रतापराव पाटील, एच. आर. जाधव, शहाजी पाटील, श्रीनिवास डोईजड, सुभाष पाटील, शहाजी भगत, एन. एच. पाटील, डॉ प्रताप पाटील आदी. 
कोल्हापूर

Vinay Kore | बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो ५० रुपयांपेक्षा अधिक राहणार

दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता ११९ रुपये देणार; ‘वारणा’ची सभा खेळीमेळीत

पुढारी वृत्तसेवा

वारणानगर : बाजारात साखरेचे दर नैसर्गिकरीत्या प्रतिकिलो ५० रुपयांपेक्षा अधिक राहणार असल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले. गत हंगामातील दुसरा हप्ता प्रतिटन ११९ रुपये दिवाळीपूर्वी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. सर्व विषय मंजूर करण्यात आले. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत विक्री किंमत प्रतिकिलो ५५ रुपये करण्याचा ठराव डॉ. कोरे यांनी मांडला. तो सभासदांनी मंजूर केला.

आ. डॉ. कोरे म्हणाले, सोनलगी (ता. जत) येथे कारखान्याच्या मालकीचा २२ मेगावॅटच्या सोलार प्रकल्पाची उभारणी करून नवीन वर्षात प्रकल्प पूर्ण कार्यान्वित करणार. गतवर्षी पहिला हप्ता प्रतिटन ३,४२५ रुपये दिला. उर्वरित ११९ रुपये दिवाळीपूर्वी देत आहे. यावर्षी दिवाळी कशी होतेय बघा? पुढील वर्षापासून दोन टप्प्यांत एफआरपी स्वीकारावी.

सचिव बी. बी. दोशिंगे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. कार्यकारी संचालक एस. आर. भगत यांनी विषयवाचन केले. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, उपाध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील, नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन. एच‌. पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ संचालक सुभाष पाटील यांनी आभार मानले. प्रा. एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

वारणा... एक कुटुंब... प्रतिटन १ किलो साखर

गेल्या ७० वर्षांत सभासद आणि कारखान्याचे कुटुंबाप्रमाणे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. त्यामुळे १५ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान येणाऱ्या उसास प्रतिटन जादा अर्धा किलो साखर व १५ जानेवारीपासून गाळप संपेपर्यंत प्रतिटन १ किलो, तर बिगर सभासद (गेटकेन) प्रतिटन एक किलो साखर देणार असल्याचेही आ. कोरे यांनी जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT