मुंबई / पुणे / कोल्हापूर : राज्यभर साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, घाऊक बाजारात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर ६० ते ८० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ऐन सणासुदीच्या उंबरठ्यावर साखरेच्या दराने उंची गाठल्याने सर्वसामान्यांचे कौटुंबिक बजेट ढासळले असून, आगामी काळात हे दर आणखी वाढण्याच्या शक्यतेने सामान्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
गेल्या ५० दिवसांत किरकोळ बाजारातील साखरेचे दर किलोमागे तब्बल १९ टक्क्यांनी वाढले आहेत. सणासुदीच्या काळात भडकलेले साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यात केवळ १५ दिवस साखरेचा साठा करण्याचे निर्बंध घालतानाच एकात्मिक दर कोट्यांतर्गत १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेची आयात ३१ ऑक्टोबरपर्यंत करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी (दि. २०) घेतला होता. तद्नंतरही शुक्रवारी बाजारात साखरेच्या दरात वाढच झाल्याचे दिसून आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली, बुलडाणा, वाशिम या तीन जिल्ह्यांत उच्च प्रतीच्या साखरेचा दर किलोला ८० रुपये होता. कोल्हापुरातही या प्रतीची साखर ७५ ते ७८ रुपये किलोने विक्री होत होती. अन्य जिल्ह्यांतही साखर प्रतीनुसार ६० ते ७५ रुपये किलो या दराने विक्री सुरू आहे. घाऊक बाजारात साखरेचा प्रति क्विंटल दर सातत्याने वाढत असून, सध्याही हा दर ६ हजार ७०० ते ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे.
साखरेच्या वाढत्या दरासाठी केवळ इथेनॉलला जबाबदार धरणे चूक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. साखरेच्या महागाईसाठी कमी उत्पादन, सणासुदीमुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊस पिकाला बसलेला फटका, जागतिक बाजारपेठेत पुरवठ्यातील कमतरता, काही व्यापार्यांकडून साठेबाजी अशी कारणे जबाबदार असल्याचे सरकारने म्हटले आहे. इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात येणार्या साखरेचा टक्का गेल्या काही वर्षांत घटला आहे, असेही केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने चांगले निर्णय घेऊन सट्टेबाजी व कृत्रिम दरवाढ खपवून घेणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. आम्ही सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत असून सध्याची दरवाढ बाजारातील मूलभूत घटकांमुळे नाही, तर सण-उत्सव जवळ आल्याने सट्टेबाजी व घाईच्या खरेदीमुळे झाली आहे. सध्या देशात साखरेचा तुटवडा नाही, असे ‘इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (इस्मा) ने म्हटले आहे.
* सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, साखरेचे दर वाढल्याने आता मिठाई विक्रेत्यांच्या खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. साखरेच्या दरवाढीचा परिणाम म्हणून यंदा मिठाई महागण्याचे संकेत मिळत आहेत. उत्पादन खर्च वाढल्यास मिठाईचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोबतच साखर दरवाढीचा चटका बाजारात चहा, कॉफी पिणार्यांनाही सहन करावा लागण्याची शक्यता आहे.