भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : राज्यात साखर कारखान्यांच्या गेटवर (एक्स-शुगर मिल) साखरेचा दर सध्या प्रतिक्विंटल ५,१६० ते ५,३३० रुपयांच्या दरम्यान स्थिर आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही साखरेला चांगला दर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रथमच सलग उच्चांकी दर टिकून राहिल्याचे चित्र आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
दरवर्षी ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत साखरेचा पुरवठा वाढून दरात घसरण होते. यंदा त्याला अपवाद ठरला आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा अतिरिक्त साठा नसल्याने मागणी चांगली आहे. त्यामुळे साखरेचे दर प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांच्या पुढे कायम आहेत. दिवाळीपूर्वीपासून दरातील स्थिरता दिवाळीनंतरही कायम राहिली आहे. एस-३० आणि एम-३० या प्रकारांनुसार साखरेच्या दरात काही प्रमाणात फरक दिसून येत आहे.
गेल्या वर्षी दर चार हजारांच्या आतच!
गेल्या वर्षी याच कालावधीत महाराष्ट्रात साखरेचा एक्स-शुगर मिल दर प्रतिक्विंटल ३,७३० ते ३,९७९ रुपये होता. कर्नाटकात सुमारे साडेचार हजार, गुजरातमध्ये ३,८७१, तर उत्तर प्रदेशात चार हजार रुपयांपर्यंत दर होता. साखरेला कमी भाव मिळत असल्याने ऊस दर देताना आर्थिक ओढाताण होत असल्याची तक्रार कारखानदारांकडून केली जात होती.
आधारभूत किंमत ३,१०० रुपये पण ....
देशात साखरेची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ३,१०० रुपये आहे. उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेता ती प्रतिकिलो ४२ ते ५५ रुपये किंवा त्याहून अधिक करण्याची मागणी साखर उद्योगातील संघटनांकडून होत आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षांपासून साखरेची विक्री या किमान किमतीपेक्षा अधिक दराने होत आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत यंदा अतिरिक्त साठा नाही. भविष्यात अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे साखरेचे दर पाच हजारांहून अधिक रुपये प्रतिक्विंटल असे स्थिर आहेत.विजय औताडे, साखर उद्योगातील अभ्यासक, कोल्हापूर
प्रमुख राज्यनिहाय
एक्स-शुगर मिल दर
राज्य प्रतिक्विंटल दर (रुपये)
महाराष्ट्र ५,१६० ते ५,३३०
कर्नाटक ५,०८० ते ५,२१०
गुजरात ५,१०१ ते ५,३८१
मध्य प्रदेश ५,३०० ते ५,४५०