एकनाथ नाईक
कोल्हापूर : सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दराने पुन्हा उसळी घेतली असून, पंधरा दिवसांत किरकोळ बाजारात किलोला तब्बल १८ रुपयांची वाढ झाली आहे. सध्या दर प्रतिकिलो ६७ ते ७० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित आणखी बिघडले आहे.
जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांकडे जूनअखेर सुमारे ५ लाख ३६ हजार ९३.५० मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक आहे. असे असतानाही बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणामुळे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. व्यापारी, डीलर्सवर साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. साखरेच्या दरवाढीचा थेट फायदा साखर कारखान्यांना होत आहे. दरात प्रतिक्विंटल सुमारे १,२०० रुपयांची वाढ झाल्याने एक मेट्रिक टनामागे कारखान्यांना सुमारे १२ हजार रुपयांचा आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे बाजारभावातील वाढीचा परिणाम कारखान्यांच्या आर्थिक गणितावरही सकारात्मक होत आहे. मात्र, दरवाढीची झळ ग्राहकांच्या खिशाला बसू लागली आहे.
सणांच्या तोंडावर मागणी वाढणार
आता श्रावण महिना सुरू असून, त्यानंतर गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी असे महत्त्वाचे सण आहेत. या काळात मिठाई, बेकरी पदार्थ, पेये व विविध खाद्यपदार्थांच्या उत्पादनासाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मागणी वाढली आणि त्याचवेळी बाजारातील आवक अपेक्षेप्रमाणे राहिली नाही, तर साखरेच्या दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत साखरेचे दर स्थिर राहणार की आणखी वाढणार, याकडे ग्राहकांसह व्यापारी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
सध्याचे साखरेचे दर
बारीक साखर
घाऊक : ६,१०० रुपये प्रतिक्विंटल
किरकोळ : ६६ रुपये प्रतिकिलो
मध्यम साखर
घाऊक : ६,२०० रुपये प्रतिक्विंटल
किरकोळ : ६८ रुपये प्रतिकिलो
मोठी साखर
घाऊक : ६,३५० रुपये प्रतिक्विंटल
किरकोळ : ७० रुपये प्रतिकिलो
जिल्ह्यात ५ लाखांवर मेट्रिक टन साखर शिल्लक
साखरेच्या दरात प्रतिक्विंटल १,२०० रुपयांची वाढ झाल्याने एका मेट्रिक टनाला सुमारे १२ हजार रुपयांचा अतिरिक्त फायदा साखर कारखान्यांना होण्याची शक्यता आहे. विभागातील ३९ कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साठा असताना, दरवाढ झाल्याने साखर उद्योगाच्या आर्थिक गणितातही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १६ आणि खासगी ७ अशा एकूण २३ साखर कारखान्यांकडे ५ लाख ३६ हजार ९३.५० मेट्रिक टन, तर विभागातील अन्य १६ कारखान्यांकडे २ लाख ८७ हजार ६५९.२० मेट्रिक टन साखर ३० जूनपर्यंत शिल्लक होती.
सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ थेट साखर खरेदीवर होत नाही, तर चहा, मिठाई, बेकरी पदार्थ आणि अन्य खाद्यपदार्थांच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या खर्चात साखरेच्या दरवाढीची भर पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत चढ-उतार सुरू असताना, आता साखरेच्या दरानेही उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटवर अतिरिक्त भार पडला आहे. साखरेचा दर ६७ ते ७० रुपयांवर पोहोचल्याने आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार असल्याचे चित्र आहे.