कोल्हापूर : ऐन दसरा-दिवाळीत साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने यंदाचा देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा कमी केला आहे. ऑक्टोबर 2025 साठी 24 लाख मेट्रिक टनांचा कोटा जाहीर करण्यात आला असून, तो गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.25 लाख मेट्रिक टनांनी कमी आहे. यामुळे साखरेचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गतवर्षी 2024 मध्ये 25.25 लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा देण्यात आला होता. यावर्षी 1.25 लाख मेट्रिक टनांनी कोटा कमी केल्यामुळे बाजारातील साखरेची उपलब्धता मर्यादित राहणार आहे. साखरेचा दर सध्या पाच टक्के जीएसटी वगळता 3,850 ते 3,900 रुपये प्रतिक्विंटल आहे. दरम्यान, साखरेची दिवाळीपूर्वी मागणी वाढणार आहे; पण मर्यादित कोटा, सणानिमित्त वाढणारी मागणी आणि साखरेच्या किमान आधार भाववाढीची शक्यता, यामुळे येत्या काही दिवसांत साखर उद्योगाला दरवाढीचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी साखर कारखान्यांनी वेळेत विक्रीचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
जाहीर केलेला कोटा आणि सणासुदीची परिस्थिती पाहता साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे सध्या असलेल्या दरामध्ये 50 ते 100 रुपये प्रतिक्विंटल वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारखान्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या साखर विक्रीचे नियोजनबद्ध धोरण आखल्यास बाजारातील तेजीचा फायदा मिळू शकतो.पी. जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक