Sugar Price Hike | साखरेचा गोडवा महागला, घरखर्चाचा ताळमेळ बिघडला  
कोल्हापूर

Sugar Price Hike | साखरेचा गोडवा महागला, घरखर्चाचा ताळमेळ बिघडला

दरात १५ दिवसांत आठ रुपयांची वाढ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यात साखरेच्या दराने उच्चांकी पातळी गाठली आहे. १५ दिवसांत किरकोळ बाजारात साखर प्रतिकिलो ७ ते ८ रुपयांनी महागली आहे. साखरेचा दर प्रतिकिलो ५२ रुपयांवर पोहोचला. महिनाभरात साखरेच्या दरात प्रति क्विंटल सुमारे सहाशे रुपयांची वाढ झाली. पावसाच्या अस्थिरतेमुळे हंगामातील ऊस उत्पादनाबद्दल निर्माण झालेली अनिश्चितता आणि केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी जाहीर केलेला कमी कोटा याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे.

केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारासाठी जुलै महिन्याचा साखरेचा कोटा कमी केला. त्यामुळे पुरवठा मर्यादित झाला आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादन झाले. कारखान्यांकडील घटलेला शिल्लक साठा, आगामी हंगामाबाबतची अनिश्चितता आणि सणासुदीच्या वाढत्या मागणीमुळे बाजारात तेजी असल्याचे साखर व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा जून आणि जुलै महिन्यात ऊस क्षेत्र असलेल्या भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून पुढील गाळप हंगामात साखर उत्पादनात सुमारे २५ ते ३० टक्यापर्यंत घट होऊ शकते, असे साखर उद्योग व कृषी तज्ज्ञांनी सांगितले. खाद्य उत्पादक मोठ्या कंपन्या, मोठ्या ग्राहकांनी आगाऊ साखर खरेदी केली आहे.

श्रावणापासून मागणी वाढणार

श्रावण, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि लग्नसराईमुळे साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही महिने साखरेची दरवाढ कायम राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. घाऊक बाजारातील साखरेच्या दरवाढीचा परिणाम किरकोळ विक्रीवर झाला आहे. साखरेचा प्रतिकिलो दर ५२ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चाट बसली आहे.

सध्याचे दर

बारीक साखर (प्रतिक्विंटल)

घाऊक : ४५०० रुपये प्रतिक्विंटल

किरकोळ : ४७ रुपये प्रतिकिलो

मध्यम साखर

घाऊक : ४६०० रुपये प्रतिक्विंटल

किरकोळ : ४८ रुपये प्रतिकिलो

मोठी साखर

घाऊक : ४७०० रुपये प्रतिक्विंटल

किरकोळ : ५२ रुपये प्रतिकिलो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT