राजेंद्र दा. पाटील
कौलव : केंद्र शासनाने यंदाच्या हंगामात 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पडलेले दर, गेल्या वर्षीची शिल्लक साखर आणि वाढत्या उत्पादनाचा अंदाज यामुळे साखर निर्यात मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी चिंता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. ब्राझीलमध्ये अद्याप साखर हंगाम सुरू असल्यामुळे किमान निर्यातीसाठी दोन महिने तरी वाट पाहावी लागेल, असे चित्र आहे.
गेल्या वर्षीच्या हंगामात देशात 291 लाख मॅट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते, तर यंदाच्या हंगामात हे उत्पादन 348 लाख टनापर्यंत पोहोचणार आहे. यातील 35 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाणार आहे. देशांतर्गत साखरेचा खप 290 लाख टन आहे.
जागतिक पातळीवरही यंदा साखर उत्पादनात वाढ अपेक्षित असून, 1817 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी 1762 लाख टन साखर उत्पादित झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने यंदाच्या हंगामात 15 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यांना गेल्या सलग तीन हंगामांत उत्पादित केलेल्या साखरेच्या 5.26 टक्के एवढा निर्यात कोटा ठरवून दिलेला आहे. गेल्या वर्षीच्या निर्यात कोट्यापैकी दोन लाख टन साखर शिल्लक राहिली आहे. देशात व जगात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला की, साखरेचे दर उतरतात, हे वास्तव आहे.
केंद्राने निर्यातीचा निर्णय जाहीर केला असला तरी जागतिक बाजारपेठेत सध्या एक्स फॅक्टरी दर प्रतिक्विंटल 3750 ते 3780 रुपये दराप्रमाणे मागणी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत हाच दर 3730 ते 3790 रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. बुधवारी सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचे टेंडर प्रतिक्विंटल 3650 रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे घसरणारे साखरेचे दर कारखानदारांची चिंता वाढवत आहेत. केंद्राने डिसेंबरसाठी 22 लाख मेट्रिक टनाचा कोटा जाहीर केला आहे; मात्र आता कोणताही सण-वार नसल्यामुळे साखरेला उठावही नाही. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील दर जवळपास समानच असल्यामुळे साखर कारखानदारांकडून निर्यातीबाबत थंड प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेतही उठाव होत नाही. साखर महासंघाने आणखी दहा लाख टन निर्यात कोटा देण्याची मागणी
केली असली तरी जागतिक बाजारातील साखरेची किंमत वाढल्याशिवाय निर्यात करण्याकडे कारखानदारांचा कल नाही. त्यामुळे आणखी दोन महिन्यांनी ब्राझीलचा साखर हंगाम समाप्त झाल्यानंतरच साखर निर्यातीला वेग येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
ऊस दराचा तिढा?
देशांतर्गत बाजारपेठ स्थिर आहे. यावर्षी शेतकरी संघटनांच्या रेट्यामुळे कारखान्यांनी जादा ऊस दर जाहीर केला आहे. साखरेला वेळेवर उठाव झाला व पैसे उपलब्ध झाले, तरच ऊस दर वेळेवर मिळणार आहे, अन्यथा ऊस दराचा तिढा निर्माण होण्याचा धोका आहे.