कोल्हापूर : सीपीआर येथील एक मोठा वृक्ष कोसळला. यानंतर तो कटरने कापून काढला गेला. या घटनेमुळे एक जुना वृक्ष नामशेष झाला. तर, दुसरीकडे याच ठिकाणी कोसळलेल्या 15 फुटी वृक्षाला जीवदान देण्यात यश आले आहे. निसर्गप्रेमींची ही कामगिरी कौतुकास पात्र ठरली आहे. यामुळे एक झाड कोसळले, तर एका झाडाला जीवदान दिले गेले आहे.
सीपीआर येथील सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. भिंतीच्या पायासाठी खोदकाम केले असल्याने येथील वृक्षांच्या मुळाशी असणारी जमीन भुसभुशीत होत आहे. परिणामी, येथील वृक्षांना धोका निर्माण झाला आहे. चार दिवसांपूर्वी हे काम सुरू असतानाच येथील 15 फुटी नांद्रूकचे झाड उन्मळून पडले. या वृक्षाबाबत सीपीआर परिसरातील सुरक्षा रक्षक जवान व निसर्गमित्र अक्षय खोंद्रे यांनी जेव्हा ही माहिती सोशल मीडियावर पाहिली. तेव्हा नांद्रूक या फायकस प्रजातीतील झाडाचे महत्त्व लक्षात घेऊन भविष्यात त्याची होणारी वाढ व यामुळे मिळणारी प्रचंड सावली ओळखून सर्व निसर्गमित्रांनी या झाडाचे पुनर्रेापण करण्याचे ठरवले.
अवघ्या 2 तासांत ट्रॅक्टर, जेसीबीसह सर्व यंत्रणांची जुळवाजुळव करून सिंक्लेअर बंगल्याशेजारील परिसरातील गर्ल्स होस्टेलच्या आवारात या झाडाचे पुनर्रेापण केले. या कामासाठी सीपीआरमधील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारीवर्ग, सुरक्षा जवान अक्षय खोंद्रे, सागर पुजारी, संपत माने, सरदार जाधव, पर्यावरणमित्र परितोष उरकुडे, अभिजित वाघमोडे सहभागी होते.
झाडाची छाटणी न करता यशस्वी पुनर्रेापण
निर्सगमित्रांनी योग्य तांत्रिक व शास्त्रीय पद्धतीने सिंगल सुपर फॉस्पेट, ह्यूमिक पावडर, कोकोपीट व गांडुळ खत समप्रमाणात वापरून झाडाची कोणतीही कटिंग न करता आहे त्या स्वरूपात या 15 फुटी नांद्रूकच्या झाडाचे यशस्वी पुनर्रेापण केले. विशेष म्हणजे, अवघ्या 2 तासांत पुनर्रोपण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्य, साधने व यंत्रणांची जुळवाजुळव केली.