‘एफडीए’च्या पथकाने जप्त केलेला तेलाचा साठा. 
कोल्हापूर

₹46 Lakh Edible Oil Seized | निमशिरगावात ४६ लाखांचे निकृष्ट खाद्यतेल जप्त

‘एफडीए’कडून मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे महाराष्ट्र अन्‍न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल २१ हजार लिटर संशयित निकृष्ट आणि चुकीचे लेबल लावलेले खाद्यतेल जप्त केलेे. या तेलाची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे ४५ लाख ९५ हजार २६० रुपये आहे. निमशिरगाव येथील अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टस्‌ लिमिटेडमधून हा साठा ताब्यात घेण्यात आला.

‘सुरक्षित अन्‍न, सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानांतर्गत तपासणी

राज्यात सुरू असलेल्या ‘सुरक्षित अन्‍न, सुरक्षित महाराष्ट्र’ या विशेष अभियानांतर्गत १३ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘एफडीए’च्या कोल्हापूर विभाग-२ च्या पथकाने ही तपासणी मोहीम राबवली. संबंधित ठिकाणी साठवलेले खाद्यतेल निकृष्ट दर्जाचे असल्याचा, तसेच त्यावर चुकीचे लेबल लावून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा संशय प्रशासनाला होता. त्यानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

निकृष्‍ट खाद्यतेलप्रकरणी आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लक्ष

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जप्त केलेला तेलाचा साठा ‘एफडीए’ने सील करून ताब्यात घेतला आहे. गोळा केलेले सर्व १० नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या तेलाचा दर्जा आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, हे स्पष्ट होऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

‘एफडीए’च्या संयुक्त आयुक्त (दक्षता) प्रीती टिपरे व पुणे विभागाचे संयुक्त आयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम पार पडली. पुणे इंटेलिजन्स ब्युरोचे अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी या प्रकरणाची गोपनीय माहिती संकलित केली होती. त्यानंतर सहायक आयुक्त पी. पी. फवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा टाकला. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी आर. पी. पाटील, व्ही. जे. पचुपाते, पी. के. घुगे, एस. पी. साळुंखे आणि एन. बी. धाळे यांचा समावेश होता. दरम्यान, अधिकाऱ्यांनी विविध कंपन्यांच्या खाद्यतेलाचे एकूण १० नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT