मुंबई : इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आ. प्रकाश आवाडे, आ. राहुल आवाडे व अधिकारी.  Pudhari File Photo
कोल्हापूर

इचलकरंजी पाणीप्रश्नी पर्यायांचा अभ्यास करा

मुख्यमंत्र्यांच्या सूचना : एप्रिलमध्ये पुन्हा बैठक; सुळकूडसह अन्य पर्यायांवर सकारात्मक चर्चा

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी शहराला पाणी देण्यासंदर्भात तिसरी योजना तयार करण्यासाठी सुळकूडसह अन्य पर्यायांचा अभ्यास करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सध्याची पंचगंगा व कृष्णा नळपाणी योजनेचे बळकटीकरण करावे, पूर परिस्थितीत पाणी साठवून वापर करण्यासंदर्भात विचार करून अहवाल सादर करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीला म्हैशाळ बंधारा किंवा शिरटी योजनेतून पाणी घेण्याविषयी सुचवले. याची सद्यस्थितीची माहिती घेत पाणीप्रश्नी पुन्हा एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात बैठक घेऊन तोडगा काढण्याचेही यावेळी ठरले.

इचलकरंजीच्या पाणीपुरवठा योजनेची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आ. राहुल आवाडे यांनी हिवाळी अधिवेशनासह केली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी विधान भवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी आ. प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होते. प्रकाश आवाडे यांनी सध्याच्या योजना सुरू ठेवून दूधगंगा कॅनॉलचे पाणी रेंदाळ गावाजवळील खणीमध्ये सोडून त्याचा वापर करता येईल, असे सांगितले; तर आ. राहुल आवाडे यांनी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असून, दूधगंगा कॅनॉलची दुरुस्ती, अस्तरीकरण करून कॅनॉलऐवजी बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासंदर्भातचा पर्याय असल्याचे सांगितले. खा. धैर्यशील माने हेही दूरद़ृश्य प्रणालीद्वारे बैठकीस हजर होते. त्यांनीही अशा योजना तातडीने राबवण्याची गरज व्यक्त केली. पुढील निर्णयासाठी 15 एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेण्याचे सांगण्यात आले.

दूधगंगा कॅनॉलद्वारे पाणी आणता येईल का, याचाही अभ्यास करा

इचलकरंजी शहरासाठी तिसर्‍या योजनेची आवश्यकता असल्याने त्यासाठी म्हैशाळ बंधार्‍यातून पाणीपुरवठा, दूधगंगा कॅनॉलमधून रेंदाळ येथील खाणीमध्ये पाणी साठवणूक करणे तसेच दूधगंगा कॅनॉलवरील पाझर तलावांचा स्त्रोत म्हणून उपयोग करणे या पर्यायांवर विचार करून अभ्यास अहवाल सादर करावा, पुराचे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प इचलकरंजीसाठी करता येईल का, याचाही विचार करण्याचे निर्देश दिले. तसेच दूधगंगा कॅनॉलद्वारे येणारे पाणी बंद जलवाहिनीतून आणता येईल का, याचाही अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT