Student Insurance Cover | उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांना लाखाचे विमा कवच 
कोल्हापूर

Student Insurance Cover | उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांना लाखाचे विमा कवच

महाविद्यालये, विद्यापीठांना ‘युवा सुरक्षा योजना’ बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

प्रवीण मस्के

कोल्हापूर : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्‍नित महाविद्यालयांमध्ये ‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना’ अनिवार्य केली आहे. विद्यार्थ्यांना अवघ्या २० रुपयांत वैयक्तिक अपघात विम्याचे संरक्षण मिळणार आहे. या निर्णयामुळे संकटाच्या काळात त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात अपघातांचे प्रमाण वाढत असताना, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. याबाबतचे आदेश राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी नुकतेच काढले आहेत. प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यास केवळ २० रुपये शुल्क आकारले जाणार असून त्यातून वैयक्तिक अपघात विमा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, अनुदानित, विनाअनुदानित, व्यावसायिक किंवा पारंपरिक अशा सर्वच अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा समान लाभ मिळणार आहे. मात्र, विद्यापीठाकडील विमा योजनेद्वारे कमी रकमेच्या हप्त्यातून यापेक्षा जास्त रकमेचे विमा संरक्षण मिळत असेल, तर नोडल अधिकारी यांच्या सहमतीने त्या विद्यापीठास त्यांची योजना चालू ठेवता येणार आहे. अत्यल्प खर्चात विद्यार्थ्‍यांना महत्त्‍वाचे आर्थिक सुरक्षा कवच उपलब्ध होणार आहे.

अधिक संरक्षणासाठी वैयक्तिक विमा

‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनें’तर्गत विद्यार्थ्‍यास एक लाख रुपयाचे विमा कवच मिळणार आहे. याशिवाय, शासनाने इतर पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्‍यांना अधिक संरक्षण हवे असल्यास ६२ रुपये भरल्यास ५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा आणि ४२२ रुपयांत २ लाखांचा वैद्यकीय विमा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

शिक्षणासोबत सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. शिक्षणासाठी दैनंदिन प्रवास करताना अपघात घडल्यानंतर एक लाखाचे विमा कवच मिळणार असल्याने कुटुंबाला आधार मिळेल.
आदित्य इंगवले, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT