kolhapur | अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतेय विद्यार्थ्यांची ‘डीअर जिंदगी’ 
कोल्हापूर

kolhapur | अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतेय विद्यार्थ्यांची ‘डीअर जिंदगी’

दहा वर्षांत विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ७९.६ टक्के वाढ; महाराष्ट्रात सर्वाधिक सुसाईडस्‌

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : अभ्यासातील अपयश, करिअरविषयक अनिश्चितता, कुटुंबीयांच्या अपेक्षा, स्पर्धात्मक परीक्षांचा दबाव, एकटेपणाची भावना आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. देशात अवघ्या दहा वर्षांत विद्यार्थी आत्महत्यांच्या संख्येत तब्बल ७९.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्राची स्थिती विशेष चिंताजनक आहे. ‘एनसीआरबी’च्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात १ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून, देशातील विद्यार्थी आत्महत्यांपैकी १३ टक्के आत्महत्या राज्यात झाल्या आहेत.

देशात विद्यार्थी आत्महत्यांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न केवळ परीक्षेच्या निकालापुरता मर्यादित न ठेवता त्याकडे व्यापक पातळीवर पाहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावामागे केवळ परीक्षेतील अपयश नसून शिक्षण, करिअर, कौटुंबिक अपेक्षा, सामाजिक दबाव, स्पर्धा आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध घटक कारणीभूत ठरत असल्याचे सरकारी अहवालातून स्पष्ट होते. देशात २०१४ मध्ये ८ हजार ६८ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नोंद होती, तर २०२४ मध्ये ही संख्या १४ हजार ४८८ वर पोहोचली. २०२३ मध्ये १३ हजार ८९२ विद्यार्थी आत्महत्यांची नोंद झाली होती. १८ वर्षांखालील आत्महत्यांमध्ये २०२४ मध्ये परीक्षेत अपयश हे १,०७१ मृत्यूंशी संबंधित कारण म्हणून नोंदले गेले आहे.

टेली मानस बनतोय आधार

टेली मानसच्या माध्यमातून मानसिक ताण, चिंता, नैराश्य आणि इतर भावनिक समस्यांबाबत समुपदेशन व मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जात आहे. महाराष्ट्रात टेली मानसच्या माध्यमातून २४ तास मानसिक आरोग्यविषयक मदत उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील टेली मानस कॉलची संख्या २०२२ मधील २ हजार ८४८ वरून २०२४ मध्ये ६६ हजार ४५ झाली, तर २०२५ मध्ये ४ डिसेंबरपर्यंत ती १ लाख २१ हजार १५१ वर पोहोचली. यात ८३.४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वाईट किंवा नकारात्मक विचार सतत येत असतील, तर ते मनात दाबून न ठेवता विश्वासातील व्यक्तीशी बोलावे. नैराश्याची लक्षणे जाणवत असतील त्याकडे दुर्लक्ष टाळा. स्वतःला ईजा करण्याचे विचार येत असतील, तर एकटे न राहता तातडीने जवळच्या मानोसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
डॉ. व्यंकटेश पोवार, मानसोपचार तज्ज्ञ, सीपीआर, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT