कोल्हापूर ः बुधवारी शेवटचा पेपर देऊन मित्रांसमवेत गेलेला शिव नवीन पटेल (वय 14, रा. टिंबर मार्केट) या आठवीतील शाळकरी विद्यार्थ्याचा रंकाळ्याजवळील खणीत बुडून दुर्दैवी अंत झाला. खणीत उडी मारल्यानंतर शिव लगेच बुडाला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केला; पण जवळपास कोणीच नसल्याने शिवला वाचवता आले नाही.
बुधवारी (दि. 16) शेवटचा पेपर देऊन शिव शाळेबाहेर पडला. त्याला घरी नेण्यासाठी वडील आले होते. आता सुट्टी लागल्याने मित्रांसोबत तासभर खेळून येतो, असे म्हणून त्याने वडिलांना परत पाठवले. त्यानंतर तासाभरात त्याच्या मृत्यूचीच बातमी घरी आली. त्यावेळी पटेल कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून गेला.
पटेल कुटुंबीय टिंबर मार्केटमधील पाटीदार भवनजवळ राहतात. नवीन पटेल यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी विधी 11 वीत शिक्षण घेत आहे. तर मुलगा शिव हा सानेगुरुजी वसाहतमधील वसंतराव देशमुख हायस्कूलमध्ये शिकत होता.शिव कधी सायकल घेऊन शाळेत यायचा, तर कधी वडील त्याला शाळेत आणून सोडत आणि घेऊन जात. बुधवारी (दि. 16) सकाळी 8 ते 10 या वेळेत त्याचा चित्रकलेचा शेवटचा पेपर होता. वडील नवीन पटेल हे सकाळी 10 वाजता त्याला घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत आले. आता सुट्टी पडल्याने मित्र लवकर भेटणार नाहीत, असे सांगत शिवने वडिलांकडे मित्रांसोबत तासभर खेळून येतो, असा आग्रह धरला. वडीलही ठीक आहे... लवकर ये म्हणून तेथून निघून गेले.
शिवने मित्रांसोबत काहीवेळ रंकाळ्यावर फिरून खाद्यपदार्थ खाल्ले. दुपारी 1 च्या सुमारास काही मित्र रंकाळा परिसरातील पतौडी खणीत पोहायला गेले. शिव स्विमिंग टँकमध्ये थोडेफार पोहायला शिकला होता. काहीवेळ सर्व मित्रांनी खणीच्या कडेला बसून आनंद लुटला. त्यानंतर खणीतील पाण्यात त्याने उडी मारली आणि बघता बघता शिव बुडाला. मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी आरडाओरडा केला; पण जवळ कुणीच नव्हते. शिव पाण्यात दिसेनासा झाला. भयभीत झालेल्या काही मित्रांनी सायकलवरून दुपारी 1.30 च्या सुमारास थेट पटेल कुटुंबीयांचे घर गाठले. तेथे शिवच्या वडिलांना घटनेची माहिती दिली.
पटेल कुटुंबीय आणि नागरिकांनी अग्निशमन दल, पोलिसांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान, पोलिस घटनास्थळी पोहोचले. जवानांनी खणीतील पाण्यात शिवचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर शिवचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तोपर्यंत खणीवर पटेल व त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने जमले होते. शिवचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पटेल कुटुंबीयांचा हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.