कोल्हापूर : हद्दवाढ आम्हाला नकोच, असे म्हणत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करत मंगळवारी 20 गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे या गावांतील सर्व व्यवहार ठप्प राहिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उचगाव : प्रस्तावित हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत उचगाव आणि सरनोबतवाडी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. एक इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही आणि लादल्यास जनतेच्या पाठबळावर मोडून काढू, असा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पैलवान मधुकर चव्हाण यांनी दिला. हद्दवाढविरोधी कृती समिती, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शांततेत बंद ठेवण्यात आले. यावेळी उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, शिवसेना (उबाठा गट) करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगुले यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. हद्दवाढ लादली गेली, तर आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा गंभीर इशाराही समितीने दिला आहे.
पाचगाव : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात मंगळवारी कळंबा, पाचगाव आणि मोरेवाडी या गावांमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; गावातील सर्व दुकाने, बाजारपेठा, आणि दैनंदिन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. ग्रामपंचायत कार्यालयांसमोर एकत्र येत संतप्त नागरिकांनी ‘हद्दवाढ रद्द करा, आमचे गाव स्वतंत्र ठेवा’ अशा घोषणा देत प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला.
हद्दवाढविरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, कोल्हापूर महानगरपालिका सध्याच्या शहरवासीयांनाच रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य यासारख्या मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत केवळ कर वसुलीच्या उद्देशाने गावांना महापालिकेत समाविष्ट करण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांमध्ये विकासकामे सुरळीत सुरू असून, हद्दवाढीमुळे गावांचे अस्तित्व, स्वातंत्र्य आणि विकासाची प्रक्रिया धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून हद्दवाढीचा निर्णय लादला, तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल. वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर संघर्ष करण्यासोबतच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाईल, असा खणखणीत इशारा कृती समितीच्या पदाधिकार्यांनी दिला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तिन्ही गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वडणगे : हद्दवाढीविरोधात वडणगेतही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्वच व्यापार, व्यवसाय दिवसभर बंद होते. सकाळपासून सर्व प्रकारची दुकाने, मॉल, छोटे-मोठे व्यवसाय यांनी बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. तसेच गावातील सेवा संस्था, पतसंस्था यांनी आपले व्यवहार बंद ठेवले, तर सहकारी दूध संस्थांनी सकाळी दूध संकलन करून सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवत हद्दवाढीला विरोध दर्शवला.