कोल्हापूर

कोल्हापूर हद्दवाढ : 18 गावांमध्ये कडकडीत बंद

Arun Patil

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीने हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या बंदला कोल्हापूर शहरालगतच्या 18 गावांतील नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक गावांमध्ये हद्दवाढीला विरोध दर्शविण्यासाठी निदर्शने करण्यात आली. पुलाची शिरोली, नागाव, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी या गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, हद्दवाढविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

महानगरपालिका प्रशासन शहरातील 81 प्रभागांतील नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाही. त्यामुळे आमच्यावर हद्दवाढ लादू नका, अशी या गावांतील ग्रामस्थांची मागणी आहे. प्रस्तावित हद्दवाढीत सहभागी शहरालगतच्या 18 गावांतील सर्व व्यवहार लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवले. गावातील सर्व नागरिकांना व व्यावसायिकांना सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंबा देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले होते. त्याला सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या गावांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, मॉल, सहकारी संस्था, पतसंस्था, शाळा बंद ठेवण्यात आल्या.

गडमुडशिंगीत उत्स्फूर्तपणे बंद

गांधीनगर : गडमुडशिंगी येथील छत्रपती शिवाजी चौकात बंदचे ग्रामस्थांना आवाहन करताना प्रभारी सरपंच तानाजी पाटील म्हणाले की, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामीण जनतेला विश्वासात घेऊन हद्दवाडीबाबत बोलायला हवे होते. यावेळी माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, अश्विनी शिरगावे आदी उपस्थित होते.

वळीवडेत कडकडीत बंद; निदर्शने

गांधीनगर : वळीवडे येथे ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून प्रस्तावित हद्दवाढीला कडाडून विरोध केला. लोकनियुक्त सरपंच रुपाली रणजितसिंह कुसाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी बंदचे आवाहन केले होते. यावेळी माजी सरपंच किरण कुसाळे, रणजितसिंह कुसाळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी विक्रम मोहिते, उदय पाटील, कपिल घाटगे, वैजनाथ गुरव, आशुतोष मोहिते आदी उपस्थित होते. चिंचवाड येथेही बंदला प्रतिसाद मिळाला.

कळंबा येथे पदयात्रा

पाचगाव : कळंबा, पाचगाव, मोरेवाडी येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. कळंबा येथे हद्दवाढीचा निषेध करत गावच्या मुख्य मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. तसेच गावातील सर्व व्यवहार बंद करून हद्दवाढीला विरोध दर्शवण्यात आला. यावेळी प्रस्तावित हद्दवाढ करण्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी सरपंच सुमन गुरव, पंचायत समिती माजी सभापती मीनाक्षी पाटील, उपसरपंच बाजीराव पोवार, रोहित मिरजे, भगवान पाटील, दीपक तिवले, विकास पोवार, प्रकाश कदम, उदय जाधव, अरुण टोपकर यांच्यासह सर्व ग्रा.पं. सदस्य, विविध तालीम, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद

उजळाईवाडी : हद्दवाढविरोधात नियोजित हद्दवाढीतील गावांत निषेधार्थ गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. नेहमी गजबजलेला शाहू नाका येथील खाऊ गल्ली तसेच शिरोली ते गोकुळ शिरगावपर्यंत महामार्गावरील सर्व व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी झाले होते. उजळाईवाडी, गोकुळ शिरगावमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हद्दवाढीच्या विरोधात घोषणा दिल्या.

बालिंगे येथे निदर्शने

दोनवडे : बालिंगे येथे गुरुवारी सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. हद्दवाढ कृती समितीच्या वतीने बालिंगे ग्रामपंचायतीपासून कोल्हापूर-गगनबावडा मार्गापर्यंत रॅली काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी हद्दवाढीविरोधात घोषणा देऊन ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान, नागदेववाडी येथेही सर्व व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध करण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, भाजपचे अमर जत्राटे, काशीनाथ माळी यांनी हद्दवाढीविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी बालिंगेचे तंटामुक्त अध्यक्ष अनिल पवार, उपसरपंच पंकज कांबळे, श्रीकांत भवड, एम. एस. भवड, अजय, भवड, धनंजय ढेंगे, नंदकुमार जांभळे, पांडू वाडकर आदी उपस्थित होते.

शिरोेलीत प्रतीकात्मक भस्मासुराचे दहन

शिरोली पुलाची : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीस विरोध करण्यासाठी संपूर्ण गाव बंद ठेवून महापालिकेचा निषेध करीत महापालिकेच्या प्रतीकात्मक भस्मासुराचे शिरोली ग्रामपंचायत चौकात दहन करण्यात आले. या बंदमध्ये व्यापारी, उद्योजक, संस्था नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वडणगे, आंबेवाडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडणगे : वडणगे व आंबेवाडी येथे सर्वपक्षीय हद्दवाढ विरोध कृती समितीने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. हा बंद शांततेत पार पडला.
गावातील सर्व नागरिकांना व व्यावसायिकांना सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंबा देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीनेही केले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळपासून सर्व दुकाने, मॉल, छोटे मोठे व्यवसाय, सहकारी संस्था, पतसंस्था, बँका, शाळा, बंद ठेवून पाठिंबा दिला.

गांधीनगरमध्ये सर्व व्यवहार बंद

गांधीनगर : हद्दवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी गांधीनगरसह परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थ व व्यापारी वर्ग बंदमध्ये सहभागी झाले. हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने सरपंच संदीप पाटोळे व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच राकेश उर्फ गुड्डू सचदेव यांच्यासह सर्व व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्ते निर्मनुष्य झाले. तावडे हॉटेलपासून चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतच्या बाजारपेठेत व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवावाढीला कडाडून विरोध केला.

उचगावमध्ये निषेध फेरी

उचगाव : 'गाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', 'देणार नाही देणार नाही, गाव आमचे देणार नाही' अशा घोषणा देत येथील हद्दवाढ कृती समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. गुरुवारी सकाळपासूनच सर्व ग्रामस्थांनी व व्यापारीवर्गाने आपापली दुकाने बंद ठेवली. मंगेश्वर मंदिराच्या प्रांगणात सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी यांनी एकत्र जमून उचगाव कमानीपर्यंत घोषणा देत निषेध फेरी काढली. यावेळी महापालिकेच्या व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

उचगाव कधीही हद्दवाढीमध्ये समाविष्ट होऊ देणार नाही, असा निर्धार हद्दवाढविरोधी कृती समिती व ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण, शामराव यादव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उमेश पाटील, दिनकरराव पोवार, शिवसेना तालुका प्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT