कोल्हापूर ते सातारा या महामार्गावरील टोल वसुली 
कोल्हापूर

कोल्हापूर-सातारा मार्गावरील ‘टोलधाड’ रोखा!

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : कोल्हापूर ते सातारा या महामार्गावरील प्रवास सध्या जीवघेणा झालेला आहे. असे असतानाही या मार्गावर किणी आणि तासवडे या ठिकाणी राजरोसपण टोल वसुली मात्र सुरूच आहे. शासनाने ही टोल वसुली तातडीने बंद करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. शासनाने याबाबतीत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास उद्रेक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मागील दोन वर्षांपासून सातारा ते कागल या 133 किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी हा सगळा महामार्ग ठिकठिकाणी उकरून टाकण्यात आला आहे. परिणामी, या महामार्गावरील सगळी वाहतूक शेजारच्या सेवा रस्त्यांवरून सुरू आहे. या सेवा रस्त्यांची अवस्था तर इतकी जीवघेणी झाली आहे की, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवावरची जोखीम पत्करण्यासारखे झाले आहे. कोल्हापूरपासून कागलपर्यंतच्या सेवा रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून पार चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना चालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वाहनांची आदळआपट होऊन वाहनातील लोकांची अवस्था हवेत उडाल्यासारखी होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वृद्ध लोक, महिला आणि लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत. एस.टी. आणि बसमधील प्रवाशांची अवस्था तर सुपातील धान्यासारखी होताना दिसत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि आदळआपट झाल्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अपघातांची, तर रोज मालिकाच बघायला मिळू लागली आहे.

या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून अशी पार वाट लागलेली असतानासुद्धा या मार्गावरील कोल्हापूर जिल्ह्यातील किणी आणि सातारा जिल्ह्यातील तासवडे या दोन ठिकाणी राजरोस टोल वसुली मात्र सुरूच आहे. मुळात कागल ते सातारा या मार्गावर सध्या महामार्गाचा थांगपत्ताच नसताना ही टोल वसुली नेमकी कशासाठी सुरू आहे, असा संतप्त सवाल वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल आणि टोलबद्दल दररोज वाहनधारक आणि टोल नाक्यांवरील कर्मचार्‍यांमध्ये बाचाबाची होताना दिसत आहे. मात्र, टोल कर्मचारी कुणालाही न जुमानता रेटून टोलची वसुली करताना दिसतात. सांगली आणि कोल्हापूरला जाणारे-येणारे बहुतेक सगळे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी याच मार्गावरून प्रवास करतात. त्यांना या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि रेटून सुरू असलेली टोल वसुली दिसत नाही की काय, असा संतप्त सवाल वाहनधारकांमधून केला जात आहे.

नियमाला हरताळ!

ज्या रस्त्यासाठी टोल आकारला जातो, त्या रस्त्याची अवस्था चांगली नसेल, तो रस्ता खराब झाला असेल, तर संबंधित कंपन्यांनी तो रस्ता दुरुस्त करेपर्यंत संबंधित मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनधारकांकडून टोल वसूल करू नये, रस्ता अपूर्ण असेल तर टोल वसुली करू नये, असा नियम आहे. टोल नाक्यावर वाहनधारकांना 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागले, टोल नाक्यावर 100 मीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या, तर मागच्या वाहनांना टोल न देता जाण्याचा हक्क आहे. इथे तर सातारा-कागल हा महामार्गच सध्या अस्तित्वात नाही. जो पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे, तो भयावह स्वरूपाचा आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवावरची जोखीम, असे होऊन बसले आहे, तरीदेखील किणी आणि तासवडे येथील टोल नाक्यांवर बिनदिक्कत टोल वसुली मात्र सुरू आहे. त्यामुळे जनतेतून उद्रेक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT