इचलकरंजी : यंत्रमागधारक आर्थिक संकटात आहेत. यासाठी केंद्र सरकारने पूर्वीप्रमाणे विविध अनुदान देणार्या योजना राबवाव्यात तसेच एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषीबरोबरच वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खा. धैर्यशील माने यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली. अलमट्टीबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करून उंची वाढवण्याचे काम थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
ते म्हणाले, कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र यांसारख्या राज्यातील पूरजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.या भागाचा सर्व्हे करून आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे काम थांबवण्याची विनंती खा. माने यांनी केली. तसेच कोल्हापूरमध्ये आयटी पार्क व्हावे, कोल्हापूर पर्यटनस्थळ होण्याकरता विशेष निधी उपलब्ध करून द्यावा आदी मुद्देही खा. माने यांनी मांडले.