विशाळगडावर दगडफेक केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.  file photo
कोल्हापूर

विशाळगडावर दगडफेक; स्थानिकांचा आरोप

संभाजीराजे गडावर पोहचण्याआधीच अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला आहे. संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते गडावर जाण्याआधीच गडावर तणाव निर्माण झाला आहे. दगडफेक आणि मारहाण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे विशाळगड परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीवरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. आज सकाळी छत्रपती शिवाजी चौक येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि तुळजाभवानीचे दर्शन घेऊन संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना झाले. संभाजीराजे आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते गडावर जाण्याआधीच गडावर मात्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिकांवर दगडफेक आणि मारहाण झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवभक्तांसह विशाळगडावर जाणारच

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी करूनही जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही. या अतिक्रमणाबाबत एकही सुनावणी न घेणारे राज्य शासन दीड वर्ष झोपा काढत होते का, असा खडा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला होता. आज शिवभक्तांसह विशाळगडावर जाणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. विशाळगडावर १५८ बांधकामांचे अतिक्रमण आहे. यापैकी सहाजण न्यायालयात गेले आहेत. मग उर्वरित अतिक्रमकणे का हटवली जात नाहीत? पुरातत्त्व विभागाची जागा असतानाही त्यांच्या परवानगीशिवाय संबंधित तहसीलदारांनी बांधकामाला परवानगी दिली आहे. विशाळगड हे काही लोकांसाठी हिल स्टेशन झाले आहे. काहीजण बकरी, कोंबडे कापतात. मद्य प्राशन केले जाते, हे कसे काय खपवून घेतले जाते, या सर्वांना कोणाचा वरदहस्त आहे, असे सवाल त्यांनी केले. दीड वर्षापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढा, अशी मागणी शिवभक्त करत आहेत. पण जिल्हा प्रशासन व राज्य शासन त्याची दखल घेत नाही. या प्रकरणातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मी करत नाही. येथे कोणत्याही एका समाजाचे अतिक्रमण नाही; तर सरसकट सर्व अतिक्रमण काढावे अशी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT