कोल्हापूर : शरीरयष्टीसाठी मॅफेरामाईन या उत्तेजक इंजेक्शनची विक्री करणार्या मोरेवाडी (ता. करवीर) येथील प्रशांत महादेव मोरे (वय 37) याला करवीर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. त्याच्याकडून इंजेक्शनच्या 20 कुपी, दुचाकी, मोबाईल असा 1 लाख23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एस. फिटनेस नावाच्या व्यायामशाळेत मॅफेटेरामाईन इंजेक्शनची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक शंकर कळकुटे यांनी ही माहिती प्रशिक्षणार्थी अपर पोलिस अधीक्षक आरांक्षा यादव, निरीक्षक किशोर शिंदे यांना दिली.
पथकाने संशयिताला मोरेवाडी येथील घराजवळ ताब्यात घेतले. दुचाकीच्या डिकीत इंजेक्शनच्या 20 कुपी आढळून आल्या. फेसबुकच्या सहाय्याने इंजेक्शन मागविण्यात आल्याचे त्याने सांगितले. संशयिताविरुद्ध यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सुजय दावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.