कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी : अवघ्या पाच दिवसांच्या जोरदार पावसामुळे राज्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील धरणांमध्ये ३५३ टीएमसी पाणीसाठा होता, तो वाढून आता ६५० टीएमसीच्या घरात गेला आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या धरणांमधील पाणीसाठ्याची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली होती. राज्यातील जनतेला वर्षभर केवळ पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी पुरेल, एवढाच म्हणजे ३५३ टीएमसी पाणीसाठा धरणांमध्ये होता. त्यामुळे राज्य शासनाने राज्याच्या बहुतांश भागात शेतीसाठीच्या पाणी उपशावर निर्बंध लागू केले होते. जून महिना सरत आला तरी राज्यात कुठेही पावसाने समाधानकारक हजेरी लावली नव्हती. त्यामुळे यंदा राज्यातील धरणे किमान क्षमतेने तरी भरतील की नाही, याबाबत राज्यभरात आशंका व्यक्त करण्यात येत होती. तसेच राज्यातील शेतकरीही धास्तावला होता.
कोयनेच्या साठ्यात वाढ!
कोयना धरणातील पाणीसाठा जूनअखेर पार रसातळाला म्हणजे ८ टीएमसीपर्यंत खाली गेला होता. पण, गेल्या पाच दिवसांत कोयना धरणात १३ टीएमसीची वाढ होऊन पाणीसाठा २१ टीएमसीवर गेला आहे. कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा खोऱ्यातील धोम (४.४१), कण्हेर (४.०२), बलकवडी (३.४३), उरमोडी (३.४३), तारळी (०.९२), चांदोली (१३.३६), राधानगरी (३.१२), दूधगंगा (३.४०), तुळशी (१.४७) आणि पाटगाव धरणातील पाणीसाठा १.३० टीएमसीपर्यंत वाढला आहे.
मराठवाड्यात प्रतीक्षा
राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत मराठवाडा विभागात पावसाचा जोर कमी असल्यामुळे उजनी आणि जायकवडी या धरणांमधील पाणीसाठ्यात फार मोठी वाढ झालेली दिसत नाही. कोकणात मात्र पावसाची मुसळधार सुरू असून, येत्या काही दिवसांतच कोकणातील बहुतांश धरणे भरतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भातही पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पाणीसाठा वाढत आहे.
‘अलमट्टी’तही वाढ, विसर्ग सुरू
महाराष्ट्राच्या हद्दीतील राजापूर बंधाऱ्यामधून कर्नाटकातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणांकडे प्रतिसेकंद ४२,६२५ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात जवळपास २१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अलमट्टीतूनही प्रतिसेकंद ८२२ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाचे आगमन!
१ जुलैपासून राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचे आगमन सुरू झाले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. राज्याच्या बहुतांश भागात इतका जोरदार पाऊस सुरू आहे की, गेल्या पाचच दिवसांत राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा दुपटीने वाढून ६५० टीएमसीपर्यंत जाऊन पोहोचला आहे. नागपूर विभागात ९४ टीएमसी, अमरावती ८८, छ. संभाजीनगर ६३, नाशिक ८१, पुणे १९१ आणि कोकण विभागात ५२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. राज्यातील लहान-मोठ्या सर्व धरणांमध्ये मिळून ६३४ टीएमसीपेक्षा जादा पाणीसाठा झाला आहे.