kolhapur | मूलभूत सुविधांअभावी राज्यातील नाट्यगृहांची दुरवस्था 
कोल्हापूर

kolhapur | मूलभूत सुविधांअभावी राज्यातील नाट्यगृहांची दुरवस्था

अपुरा एसी, अंधूक मेकअपरूम, अक्षम ध्वनियंत्रणा; कमतरतांमुळे कलाकार, प्रेक्षक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : पुरेसे लाईट नसलेल्या अंधूक मेकअपरूम, आसन क्षमतांच्या तुलनेत अपुरी व सदोष वातानुकूलन यंत्रणा, संवादांचा आवाज शेवटच्या रांगेपर्यंत न पोहोचणारी अक्षम ध्वनिव्यवस्था, मळकट पडदे, कुशन गेलेल्या खुर्च्या, दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ स्वच्छतागृहे. हे चित्र आहे राज्यातील बहुतांशी नाट्यगृहांतील असुविधांचे. अनेक नाट्यगृहांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कलाकार आणि प्रेक्षकांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही सुधारणा होत नसल्याने कलाकार व प्रेक्षक त्रस्त आहेत.

राज्यात शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून सुमारे १०० ते १५० नाट्यगृहे व प्रेक्षागृहे कार्यरत आहेत; मात्र यापैकी अनेक नाट्यगृहांमध्ये देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक सुधारणा वेळेवर होत नाही. काही नाट्यगृहांमध्ये डास, उंदीर यांचाही त्रास आहे. अखिल भारतीय नाट्यपरिषदेनेही आता याबाबत सरकारला हाक दिली आहे.

नाट्यगृहांतील सुविधांबाबत नाट्यगृह धोरण निर्मिती केवळ चर्चेतच अडकली आहे. धोरणाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. बैठका होतात मात्र निर्णय नसल्याने हा प्रश्न जैसे थे आहे. २०१६ रोजी सांस्कृतिक विभागाने घेतलेल्या बैठकीनंतर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही.

नाट्यगृहांतील प्रमुख समस्या

कालबाह्य पडदे, विंगफ्रेम, रंगमंचीय साहित्य आणि तांत्रिक उपकरणांमुळे नाट्यगृहांना अवकळा

मेकअप रूममधील योग्य प्रकाशयोजना अभावी रंगभूषा आणि वेशभूषेची तयारी करताना अडचणी

अनेक नाट्यगृहांतील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता व देखभालीकडे दुर्लक्ष

आसनक्षमतेच्या तुलनेत अपुऱ्या वातानुकूलन यंत्रणेमुळे वातावरणात अस्वस्थता

अक्षम ध्वनियंत्रणेमुळे अस्पष्ट संवादांचा नाट्यप्रयोगाच्या गुणवत्तेवर परिणाम

ज्या महाराष्ट्रात रंगभूमीने सुवर्णकाळ गाजवला त्याच महाराष्ट्रातील सध्या अनेक नाट्यगृहे सुविधांच्या बाबतीत दयनीय आहेत. तक्रार केल्यास, जरा ॲडजेस्ट करा अशा प्रकारची उत्तरे नाट्यगृह व्यवस्थापनाकडून मिळतात. कलाकार आणि प्रेक्षकांना दर्जेदार वातावरण मिळाले तरच रंगभूमीचा विकास सक्षमपणे होईल.
प्रशांत दामले, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT