इचलकरंजी : संवाद मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व माजी आ. सुरेश हाळवणकर. समोर उपस्थित कार्यकर्ते. Pudhari File Photo
कोल्हापूर

हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देऊ

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : आ. प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर एकत्र आल्यामुळे इचलकरंजीसह परिसरातील मतदारसंघात भाजपला बळ मिळाले आहे. भाजप तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे हाळवणकर यांची पक्षावरील निष्ठेची दखल गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली असून, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर निश्चितच संधी देण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

इचलकरंजीतील कमळ चिन्हावरील उमेदवार राज्यातील सर्वाधिक मते घेऊन निवडून येईल यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केलेे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार असल्यास सर्वसामान्य जनतेची कामे गतीने होतील. हाळवणकर यांना विधान मंडळात कामाचा अनुभव असून, वीज सवलतीसह अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. पक्ष निष्ठेने काम करणार्‍यांना नक्की न्याय देतो.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, भाजप सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करतो. हाळवणकर हे पक्षाचे वैभव आहेत. त्यागाची भावना ठेवणार्‍यांना पक्ष नक्कीच न्याय देतो. सुरेश हाळवणकर म्हणाले, आ. प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रवेशाविषयी महत्त्वाचा निर्णय पक्षाने संघटनेसाठी घेतला. विरोधातल्या संघर्षाला पूर्णविराम दिला आहे. पक्ष संघटनेच्या वाढीसाठी घेतलेला हा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे. आवाडेंसोबत मनाने एकत्र आल्यास इचलकरंजीतील महायुतीचा उमेदवार राज्यात उच्चांकी मते घेऊन निवडून येईल. महापालिकेवरही कमळाचा महापौर होईल. त्यामुळे महायुतीला ताकद देण्यासाठी कार्यकर्त्यांनी नाराजी न ठेवता जोमाने कामाला लागावे. भाजपचे प्रभारी निरीक्षक माजी आ. संजय पाटील म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या कामाची पक्षाकडून निश्चित पोहोचपावती दिली जाते. यामुळेच मला आमदारकीची संधी मिळाली. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनीही मनोगत व्यक्त केले. भाजप शहराध्यक्ष पै. अमृत भोसले यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास खा. धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, निरीक्षक मकरंद देशपांडे, अशोक माने, सौ. अलका स्वामी, धोंडिराम जावळे, तानाजी पोवार, मिश्रीलाल जाजू, राजेश रजपुते, जयेश बुगड, दीपक पाटील, उमाकांत दाभोळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्याला आवाडेंची अनुपस्थिती

माजी आ. सुरेश हाळवणकर यांच्यावर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांचा मेळावा असल्याने या मेळाव्याला नुकतेच भाजप पक्षात प्रवेश केलेले हाळवणकर यांचे कट्टर विरोधक आ. आवाडे यांनी उपस्थिती न दाखवल्यामुळे कार्यक्रमस्थळी त्याची चर्चा होती. दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस भाजप प्रवेश होऊनही आ. आवाडे यांनी इचलकरंजीतील भाजप कार्यालयाला भेट दिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अद्यापपर्यंत स्वीकारलेले नाही. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी हा वाद मिटवण्यासाठी बैठक घेतली. परंतु, या बैठकीला आ. आवाडे यांची अनुपस्थिती सर्वच कार्यकर्त्यांच्या लक्षात राहिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT