कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने न्याय संकुलात रविवारी (ता. 3) राज्य वकील परिषदेचे आयोजन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते व कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना व्हराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेसाठी राज्य तसेच देशभरातून दीड हजारांहून अधिक वकील सहभागी होणार आहेत.
'न्याय सर्वांसाठी या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी' ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर आणि संजय देशमुख, महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ, गोव्याचे अॅडव्होकेट जनरल देवीदास पनगम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष
सुरेंद्र तावडे आदी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या आग्रही मागणीसोबत वकिलांचे प्रश्न, नवोदित वकिलांसमोरील समस्या, न्यायालयीन कामकाजातील दिरंगाई कमी करण्यासाठीचे उपाय आदींवर या परिषदेत चर्चा होणार आहे. ठरावही मंजूर करण्यात येणार आहेत.