जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियानात जयसिंगपूर नगरपरिषदेने पुणे विभागात चौथा क्रमांक पटकावला आहे. यामुळे पालिकेला दीड कोटी रुपयेचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी दिली.
येथील नगर पालिकेचे तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल केली आहे. शहरात वृक्ष लागवड, पर्यावरण पूरक बोलक्या भिंती, चौकांची स्वच्छता, शहरात स्वच्छ शहर सुंदर शहर असे फलक, शहरातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या खुल्या जागांमध्ये नगरपालिकेने उद्याने उभी केली असून ओल्या व सुख्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. शहर हागणदारी मुक्त, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वनसंवर्धन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता, विजेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रोत्साहन देणे असे विविध प्रकल्प राबवलेले आहेत.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान २ ऑक्टोंबर २०२० पासून रायविण्यास सुरुवात झाली. माझी वसुंधरा अभियान ३.० हे दिनांक १ एप्रिल २०२२ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्थानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये जयसिंगपूर नगरपरिषदेने चांगल्या प्रकारे काम केलेने विभागस्तरामध्ये चौथा क्रमांक मिळाला आहे.
यामध्ये पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या गटामध्ये येथील नगर परिषदेचा पुणे विभागस्तरावर चौथा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे पालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. या यशासाठी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तैमुर मुलाणी, विद्यमान मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी अथक परिश्रम घेतल्याने हे यश मिळाले आहे. या यशासाठी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांचं शहरातून कौतुक होत आहे.