कोल्हापूर : सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एरव्ही दस्त नोंदणीसाठी गर्दीने गजबजून गेलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी असा शुकशुकाट होता.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Government Employees strike | संपाचा दणका, पाच कोटींच्या महसूलला फटका!

जिल्ह्यातील सर्वच 18 दुय्यम निबंधक कार्यालयांत शुकशुकाट

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सरकारी कर्मचार्‍यांच्या मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाचा परिणाम बुधवारी दुसर्‍या दिवशीही शासकीय कार्यालयांवर झाला. त्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाच्या जिल्ह्यातील सर्वच 18 दुय्यम निबंधक कार्यालयांतील कामकाज ठप्प झाल्याने सलग दुसर्‍या दिवशीही दस्त नोंदणी झाली नाही. यामुळे दोन दिवसांत सुमारे 5 कोटींच्या महसुलावर परिणाम झाला.

जिल्ह्यात दुय्यम निबंधकांची 18 कार्यालये आहेत. या सर्वच कार्यालयांसह जिल्हा मुद्रांक अधिकारी व जिल्हा सहनिबंधक कार्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामुळे या सर्व कार्यालयांतील कामकाज बंद आहे. 18 पैकी 6 कार्यालयांतील दुय्यम निबंधक वर्ग दोनचे अधिकारी आहेत, ते कामावर आहेत; मात्र अन्य कोणतेच कर्मचारी नसल्याने कार्यालयांतील दस्त नोंदणीची कोणतेही काम झाले नाही. संप मिटेल, दस्त नोंदणी होईल म्हणून सकाळपासून दुय्यम निबंधक कार्यालयाकडे विचारणा करणार्‍या, प्रत्यक्ष येणार्‍या नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी दस्त नोंदणीसाठी पूर्वतयारी केली होती. याकरिता स्वाक्षर्‍या करणार्‍यांनी आपल्या कामाचेही नियोजन केले होते; मात्र संपामुळे नोंदणीच न झाल्याने त्यांचे दिवस वाया गेले.

नकला, रिफंडचीही कामे रखडली

केवळ दस्त नोंदणीच नाही, तर जिल्हा मुद्रांक कार्यालयात विविध प्रकारच्या नकला, रिफंड (विविध परतावे) आदींची कामे रखडली आहेत. या कामांसह या विभागातील प्रशासकीय कामकाजावरही मोठा परिणाम झाला आहे.

दररोज 400 दस्त नोंदणी; अडीच कोटींचा महसूल

जिल्ह्यातील 18 कार्यालयांत दररोज सरासरी 400 दस्त नोंदणी होते. यामध्ये सर्वाधिक खरेदीपत्रांचा समावेश आहे. यासह तारण, वाटणीपत्र, हक्कसोड, करार यांचीही संख्या अधिक असते. या दस्त नोंदणीतून सरकारला दररोज सुमारे अडीच कोटींचा महसूल मिळतो. मात्र, संपामुळे दोन दिवसांत सुमारे 800 नोंदण्या रखडल्या. त्यातून मिळणार्‍या सुमारे पाच कोटींच्या महसुलावर परिणामही झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT