Majhi Ladki Baheen' scheme
'माझी लाडकी बहीण' योजना Pudhari File Photo
कोल्हापूर

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी ‘अ‍ॅप’वर 21 ते 60 या वयोगटातील महिलांचेच अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात होते. राज्य शासनाने वयोमर्यादेत 65 वर्षांपर्यंत वाढ केली आहे. त्यानुसार या अ‍ॅपमध्ये तसे बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती लवकरच पूर्ण होईल आणि 65 वर्षांपर्यंतच्या सर्व पात्र महिलांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील, असे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना 28 जूनपासून सुरू केली. मात्र, या योजनेतील काही अटी, नियमांत बदल करण्यात आले. त्यानुसार वयोमर्यादा 21 ते 60 ऐवजी 21 ते 65 अशी करण्यात आली. याखेरीज या योजनेचा कुटुंबातील अन्य पात्र महिला सदस्यांसह एका अविवाहित मुलीलाही लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारपासून ठिकठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, या अ‍ॅपद्वारे केवळ 21 ते 60 या वयोगटातील महिलांचेच अर्ज स्वीकारले जात होते. यामुळे अ‍ॅपमध्ये आवश्यक बदल करण्याची प्रक्रिया दुपारनंतर सुरू करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. आवश्यक ते सर्व बदल लवकरच होतील आणि सर्व पात्र महिलांचे अर्ज स्वीकारले जातील, असेही महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हास्तरीय समितीची आज बैठक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय समितीची पहिली बैठक शुक्रवारी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. ही योजना अर्थसंकल्पात मंजूर केल्याबद्दल कागल येथील गैबी चौकात सकाळी 9 वाजता महिलांकडून पालकमंत्री मुश्रीफ यांचा सत्कार होणार आहे.

SCROLL FOR NEXT