कोल्हापूर : राज्यातील एसटी बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या नावाखाली लूट सुरू आहे. त्यामुळे खासगी कंत्राटदारांकडून ती महामंडळ ताब्यात घेणार आहे. 1 जूनपासून राज्यातील एसटीच्या सर्व आगारांतील प्रसाधनगृहे सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. शुक्रवारी कोल्हापुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, प्रसाधनगृहांचा देखभाल खर्च प्रवाशांकडून न घेता एसटी महामंडळ करणार आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांकडून 5 ते 10 रुपये बेकायदेशीर वसूल केले जात आहेत. अशा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या लोकांची दुकानदारी आता आम्ही कायमची बंद करणार आहे. 15 तारखेपासून लावलेला दोन रुपयांचा स्वच्छता करही रद्द केला जाणार असून एक जूनपासून प्रवाशांना एकही रुपया द्यावा लागणार नाही. प्रत्येक एसटी बसमध्ये कचरा कुंडी ठेवली जाईल. बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वी मशिनद्वारे स्वच्छ केली जाईल. स्थानक परिसराची स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून, दर 4 तासांनी बसस्थानक चकाचक केले जाणार आहे. चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षात गरम पाण्यासह विविध सोयी-सुविधा आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
मला पाहणी दौरे बंद करावे लागतील
बसस्थानकातील स्वच्छता बघून मी खरोखर भारावून गेलो होतो. एवढी स्वच्छता नियमित होत असेल, तर मला पाहणी दौरे बंद करावे लागतील; पण ही स्वच्छता केवळ मंत्री येणार म्हणून एका रात्रीत झालेली आहे, असे सांगून सरनाईक यांनी कोल्हापूर एसटी प्रशासनाचे कान टोचले.