पेठवडगाव : एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने लांबविणार्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात वडगाव पोलिसांना यश आले. तिघांना अटक करून त्यांच्याकडून 45 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. सूरज सुरेश तिडंगे (वय 32, रा. सुभाषवाडी, अंबरनाथ वेस्ट), जुड अल्बर्ट जोसेफ (32, रा. भाटनगर पिंपरी, पुणे), गणेश गायकवाड (44, रा. फातिमा चर्च संतोषी माता मंदिरजवळ अंबरनाथ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
काही महिन्यांपूर्वी वडगाव येथे एसटीत चढताना अनिता अर्जुन पाटील (रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्या हातातील अडीच तोळे वजनाची बांगडी तसेच वाठार येथील बसस्थानकावर एसटीत चढत असलेल्या सुलोचना बळवंत शिर्के (65, रा. वाठार तर्फ वडगाव) यांच्या हातातील दोन तोळे वजनाच्या बांगड्या कापून लंपास करण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे हालचाली टिपल्या. वाठार तसेच वडगाव बसस्थानकावर साध्या वेशात पाळत ठेवली. तिघे संशयित वावरत असल्याचे निदर्शनास आले. तातडीने या तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 45 ग्रॅम सोन्याचे दागिने व कात्री जप्त केली. ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, हवालदार जितेंद्र पाटील, आबासो गुंडणके, तात्यासाहेब मुंढे, लखनराज सावंत, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर यांच्या पथकाने केली. दरम्यान, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.