कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : देशातील व्यवस्थेचे चांगुलपण मोजण्याचे एक सोपे मापक म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवा होय. एस.टी.ची सेवा त्याच टप्प्यात मोजली जाते; पण याच सेवेतील अडचणी पुढे येऊ लागल्या आहेत. कामगारांना आंदोलनाच्या माध्यमातून न्याय्य मागण्यांसाठी वारंवार आंदोलन करावे लागत आहे. (ST employees Strike)
आतापर्यंत एस.टी.च्या कर्मचार्यांचे चार संप झाले. त्यामध्ये 1972 साली पहिला संप झाला, तो 17 दिवस होता. त्यानंतर 2015 साली 2 दिवस, 2017 साली 6 दिवस, 2018 साली 2 दिवस व सध्या गेले 30 दिवस संप सुरू आहे. एस.टी.च्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस संप सुरू आहे.
यापूर्वीच्या संपांचे या संपाने रेकार्ड मोडले आहे; पण संपाचा फटका गोरगरीब व ग्रामीण भागातील प्रवाशांना बसत आहे. दुप्पट ते तिप्पट भाडे देऊन लोकांना प्रवास करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे असून, यातून मार्ग निघणे हाच यावर उपाय आहे.
या संपामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागाचे 12 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. त्याचबरोबर एस.टी.च्या यंत्रशाळेतील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी असल्यामुळे तेथील सर्व काम ठप्प आहे. त्यामुळे बसेस मार्गावर असताना त्या दुरुस्त कराव्या लागणार आहेत, त्याचाही खर्च महामंडळावर पडणार आहे. (ST employees Strike)
कोल्हापूर विभागातील कर्मचारी संख्या
1. चालक 1,393, वाहक 1,550, अधिकार्यांसह प्रशासकीय कर्मचारी संख्या 200, कार्यशाळेत सुमारे 900 तांत्रिक कामगार आहेत.
2. सध्या जिल्ह्यातील 12 आगारांपैकी 10 आगारांतून प्रवासी वाहतूक सुरू आहे; पण ही प्रवासी वाहतूक संथगतीने सुरू आहे.
3. बसेस 650, दररोजचे 40 लाखांचे नुकसान;30 दिवसांचे 12 कोटींचे उत्पन्न बुडाले.
4. दररोज 4,500 फेर्या होत होत्या; आता 137 फेर्या होत आहेत.
एस.टी. अजून किती दिस येणार नाय..?
गडहिंग्लज ; प्रवीण आजगेकर : दिवाळीपासून एस.टी.ची नुसती वाटच बघतोया… पण एस.टी. काय ईनाच… आता अजून किती दिस एस.टी. येणार नाय..? अशी विचारणा गडहिंग्लज उपविभागातील ग्रामीण भागातील माय माऊली करताना दिसत आहेत. एस.टी. संपामुळे या महिला भगिनींना अनेक कामांसाठी घराबाहेरच पडता आले नाही नसून, वडापला परवानगी दिली असली; तरी ग्रामीण भागामध्ये हे वडापवाले जातच नसल्याने या सर्वांसमोर आता प्रवासाचा यक्ष प्रश्नच आहे. (ST employees Strike)
गडहिंग्लज उपविभागातील निम्म्याहून अधिक गावे ही अतिदुर्गम भागामध्ये असून, गडहिंग्लजपेक्षाही आजरा व चंदगडमधील अनेक वाड्यावस्त्या दुर्गम भागामध्ये आहेत. या ठिकाणच्या रहिवाशांना विविध कारणांसाठी शहराकडे यायचे असल्यास एस.टी.शिवाय पर्याय नाही. या भागामध्ये वडापही पोहोचत नाही. दुचाकींची संख्याही मर्यादित असून, पुरुष मंडळी दुचाकीवरून कामांसाठी बाहेर पडत असली, तरी महिलांना मात्र समस्याच अधिक येत आहेत. एस.टी.चा संप सुरू झाल्यानंतर वडापला परवानगी देण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात हे वडापवाले केवळ चांगले उत्पन्न होणार्या मार्गांवरच आपल्या गाड्या पळवतात.
लेकीकडे जाणारी वृद्धा बेशुद्ध
एस.टी. बंदचा फटका कसा बसतो याचे उदाहरणही आठवडाभरापूर्वी उत्तूर (ता. आजरा) येथे दिसून आले. एस.टी.अभावी एक वृद्धा आपल्या लेकीला भेटण्यासाठी चक्क चालतच जात असताना अतिचालण्याने ती उत्तूरमधील रस्त्यावर चक्कर येऊन पडली. बघ्यांनी तातडीने मदत करत उपचार केल्याने अनर्थ टळला.
वडाप भाडेवाढीचा 'डबलबार'
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : एस.टी. संपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याने एस.टी. फेर्यांचे वेळापत्रक बिघडलेलेच आहे. जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी प्रवाशांना वडापचा आधार घ्यावा लागतो आहे. प्रवाशांच्या या हतबलतेचा गैरफायदा घेत काहींनी दुप्पट ते चौपट भाडे आकारण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. एस.टी. संपाच्या आडून भाडेवाढीचा डबलबार उडविणार्यांवर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल आहे.
पुण्याला जाण्यासाठी 800 ते 1 हजार रुपये आकारले जात आहेत. सांगलीचे एस.टी.चे 70 रुपये भाडे आहे, तर वडापवाले दीडशे ते दोनशे रुपयांची मागणी करीत आहेत. जिल्हांतर्गत वाहतूक बंद असल्याचा मोठा फटका शेतकरी, विद्यार्थी, नोकरदारांना बसत आहे. त्यांना दीड ते दोनपट रक्कम आकारून प्रवास करावा लागत आहे.
चालक मिळाला तरच एस.टी. धावते
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून पुण्याला जाणार्या शिवशाहीव्यतिरिक्त जिल्हांतर्गत मलकापूर, इचलकरंजी, गारगोटी, गडहिंग्लज आणि चंदगडला काही एस.टी. धावत आहेत. यापूर्वीच्या 20 ते 25 फेर्यांवरून ही संख्या आता 4 ते 5 वर आली असून, चालक मिळाला तरच एस.टी. धावते, अशी अवस्था बनली आहे.