कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठ संचलित श्री शाहू कुमार भवन प्रशालेने कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवनमध्ये चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. शनिवारी (दि.१५) रोजी आमदार सतेज पाटील यांच्याहस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कल्पक आणि आकर्षक रंगसंगतीतून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या १०० हून अधिक सुंदर कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.
वॉटर कलर, ॲक्रालिक, चारकोल, ग्रेफाइट पेन्सिल, ऑईल पेस्टल, कलर पेन्सिलचा वापर करुन विद्यार्थ्यांनी ही चित्रे रेखाटली आहेत. व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे, स्थिर चित्रे, मंडल आर्ट आदी कलाकृती लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा आधारित चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रणजित चौगले यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी श्री शाहू कुमार भवन शाळेचे मुख्याध्यापक डॉ. एस. बी. शिंदे, दळवी आर्ट कॉलेजचे प्राचार्य अजय दळवी, कोल्हापूर कलाध्यापक संघ अध्यक्ष दादासाहेब लाड, पर्यवेक्षक डी. डी. मांडे आणि शिक्षकवर्ग, पालक उपस्थित होते. यावेळी प्रदर्शनातील चित्रांची माहिती करुन घेत सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.