पेठवडगाव : भरधाव वेगाने धावणार्या चारचाकीने दोन दुचाकीसह दुसर्या एका चारचाकीला दिलेल्या धडकेत धैर्यशील उदय जाधव (वय 5, रा. अंबप, ता. हातकणंगले) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे आई-वडील व बहिणीसह अन्य सहा जण गंभीर जखमी झाले. वाठार-वारणानगर मार्गावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
बागलकोट (कर्नाटक) येथील चारचाकी (केए 29 ए 6815) विशाळगडहून मिरजकडे जात होती. तळसंदे गावच्या वळणावर या गाडीने एका दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत मोहन बाबासाहेब शेटे (वय 55, रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) व माधुरी अनिल बुड्डे (रा. पारगाव) जखमी झाले. यानंतर चालक सदाशिव चिकन्नवरमठ याने गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. वाठारच्या दिशेने वेगाने जाताना वारणा बाजार येथील पेट्रोल पंपासमोर एका चारचाकी सुमोला धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या चारचाकीने समोरून येणार्या दुचाकीला धडक दिली.
या धडकेत अविनाश ऊर्फ उदय अशोक जाधव, त्यांची पत्नी प्रियांका (वय 28), मुलगी कीर्तिका (11) व मुलगा धैर्यशील हे चौघेही रस्त्यावर फेकले गेले. यात धैर्यशीलचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत उदय, प्रियांका व कीर्तिका यांना तातडीने वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.