टोप : हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर बसस्टॉपवर रात्री 8 च्या सुमारास झालेल्या अपघातात भरधाव कारने दोन मोटारसायकलना उडविले व ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सलूनमध्ये घुसली.
पेठवडगावकडून टोपच्या दिशेने जाणार्या कार (एम.एच. 09 बीएम 6811) चालकाने भरधाव व बेदरकारपणे कार चालवत पहिल्यांदा संभापूर गावात प्रवेश करून मिणचेकडे जात असलेल्या स्कूटर (एम.एच. 03 डीटी 2309) ला धडक दिली. यात स्कूटरवरील सचिन कांबळे (रा. मिणचे) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर या कारने तिथून 100 मीटर अंतरावर असलेल्या लाँड्रीसमोर उभ्या असलेल्या मोटारसायकल (एम.एच. 09 डब्ल्यू 0214) ला दिलेल्या धडकेत या मोटरसायकलवरील हर्षवर्धन सुरेश जाधव (रा. घुणकी) हा किरकोळ जखमी होऊन मोटारसायकलीचे नुकसान झाले. यानंतर ही कार जवळच असलेल्या सलूनमध्ये घुसली. सुदैवाने कार थांबल्याने सलूनमधील कोणाला दुखापत झाली नाही. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.