कोल्हापूर : खगोलप्रेमी आणि आकाश निरीक्षकांसाठी मंगळवारची रात्र खास ठरली. आकाशात पौर्णिमेचा पूर्ण चंद्र ‘सुपरमून’ अवस्थेत पाहायला मिळाला. नागरिकांसह सर्वांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली.
नोव्हेंबर महिन्यातील या पौर्णिमेच्या चंद्राला ‘बीव्हर मून’ असे संबोधले जाते. चंद्राचे हे विलोभनीय रूप नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या कक्षेत येतो, तेव्हा त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. या स्थितीत चंद्र नेहमीच्या पौर्णिमेपेक्षा सुमारे १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी दिसतो. यावेळी चंद्राचा ९९ ते १०० टक्के भाग सूर्य प्रकाशाने उजळून निघाला होता. त्यामुळे रात्रीच्या आकाशात लख्ख चांदणे पसरले होते. चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि अधिक तेजस्वी दिसत होता, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली.