कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीसाठी कोल्हापुरातून पालकमंत्री प्रकाश आबिटकर ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकारी. 
कोल्हापूर

Guardian Minister Prakash Abitkar | कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी विशेष पॅकेज द्या : पालकमंत्री

‘जिल्हा नियोजन’चा अतिरिक्त 410 कोटींसह 947 कोटींचा आराखडा सादर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी मागणी केलेल्या 410 कोटींच्या अतिरिक्त निधीसह कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी केली. ‘जिल्हा नियोजन’च्या 2026-27 या वर्षासाठी 410 कोटींच्या अतिरिक्त मागणीसह 947 कोटी 21 लाखांचा प्रारूप आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला.

जिल्हा नियोजनच्या प्रारूप आराखड्याच्या मंजुरीबाबत राज्यस्तरीय बैठक मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्याचा 947 कोटी 21 लाखांचा आराखडा सादर केला. 2026-27 साठी राज्य शासनाने जिल्ह्याकरिता 537 कोटी 20 लाख रुपयांचे नियोजन दिले होते. त्यात अतिरिक्त 410 कोटी रुपयांचा समावेश केला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजना तसेच विविध प्रकल्पांसाठी या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. यामुळे हा वाढीव निधी मिळण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापुरात येणार्‍या भाविक आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता सर्किट बेंचमुळेही पाच जिल्ह्यांतून लोक कोल्हापुरात येत आहेत. शहरात आयआरबी कंपनीकडून रोड झाल्यानंतर रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला नाही. सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था खराब आहे. यामुळे कोल्हापूरच्या रस्त्यांसाठीही विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी केली.

कोल्हापूर ही क्रीडा नगरी आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे शहर आहे. यामुळे या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा दिल्यास अनेक खेळाडू निर्माण होतील. बारामती आणि नागपूर प्रमाणेच कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी आवश्यक 199 कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत महापालिकेच्या मुख्य कार्यालयाची शेंडा पार्क येथे प्रस्तावित नव्या इमारतीसाठी 103 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणीही आबिटकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

यावेळी मुंबई येथील बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT